CoronaVirus Lockdown : चाकरमान्यांची विशेष व्यवस्था करू : सुनील घाडीगांवकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 09:14 PM2020-04-11T21:14:31+5:302020-04-11T21:16:01+5:30
लॉकडाऊन शिथिल झाल्यास मुंबई, पुणे येथे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने असणाऱ्या आपल्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गावाकडे येण्याची परवानगी मिळावी. आम्ही आमच्या गावात अशा चाकरमान्यांची विशेष व्यवस्था करू. प्रशासनाच्या सूचनेनुसार त्यांना वस्तीपासून लांब शाळा, सार्वजनिक ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवू, अशी भूमिका पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडली.
मालवण : लॉकडाऊन शिथिल झाल्यास मुंबई, पुणे येथे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने असणाऱ्या आपल्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गावाकडे येण्याची परवानगी मिळावी. आम्ही आमच्या गावात अशा चाकरमान्यांची विशेष व्यवस्था करू. प्रशासनाच्या सूचनेनुसार त्यांना वस्तीपासून लांब शाळा, सार्वजनिक ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवू, अशी भूमिका पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडली.
लॉकडाऊन शिथिल झाले तर तालुक्यात अन्य ठिकाणांहून येणाऱ्या कुटुंबांतील माणसांना आपण रोखणार नाही. मात्र, आपल्या आरोग्य यंत्रणेने सर्वांची तपासणी व अन्य सुरक्षा उपाययोजना यासाठी अधिक सक्षम रहायला हवे, अशी भूमिका सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, कमलाकर गावडे यांनी मांडली.
सोशल डिस्टन्सिंग पाळून मालवण पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, गटनेते सुनील घाडीगावकर, कमलाकर गावडे, विनोद आळवे, अशोक बागवे, मनीषा वराडकर, सोनाली कोदे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, सागरिका लाड यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यात डॉक्टर, नर्स, आशा व सर्व आरोग्य यंत्रणा चांगले काम करत आहेत. कोरोना आपत्ती काळातील हे काम अभिनंदनीय आहे असे सांगत अभिनंदनाचा ठराव घाडीगावकर यांनी मांडला. कमलाकर गावडे यांनी सर्वांच्या चांगल्या कामामुळे तालुका कोरोनामुक्त असल्याचे सांगितले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी आरोग्य, पंचायत समिती व ग्रामपंचायत यंत्रणेमाफत सुरू असलेल्या आरोग्य उपाययोजना व संपूर्ण कामाचा लेखाजोखा मांडला.
काही रास्तधान्य दुकानांच्या ठिकाणी मनमानी होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र शासन निकषानुसार लाभार्थ्यांना धान्य मिळावे. लाभार्थी यादी स्थानिक लोकप्रतिनिधींना मिळावी. जेणेकरून प्रत्येकाला धान्य वितरण करणे सुलभ होईल. जे गावात नाहीत अशा व्यक्तींचे धान्य शिल्लक राहत असेल तर धान्यापासून वंचित असलेल्यांना ते धान्य मिळावे, अशी मागणी घाडीगावकर व उपसभापती परुळेकर यांनी केली.