शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत मार्ग काढू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आश्वासन
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: February 16, 2023 04:19 PM2023-02-16T16:19:20+5:302023-02-16T16:19:52+5:30
शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरले जातील
सिंधुदुर्ग: शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनात ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन महाअधिवेशनाची सुरुवात झाली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे, माजी आमदार राजन तेली, निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी राज्याध्यक्ष काळुजी बोरसे पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वेंगुर्लामध्ये पार पडत असलेल्या दोन दिवसीय महाअधिवेशनात विचारमंथन होईल तसेच विचारांचे आदान-प्रदान होईल. त्यामुळे आपण या महाधिवेशनातून काहीतरी चांगलं घेऊन जाल. आपल्या राज्यात-देशात गुरुला फार महत्व आहे. आई-वडिलानंतर गुरुचं, शिक्षकांचं स्थान हे आयुष्यामध्ये सर्वांच्या आदराचं आहे. जसे डॉक्टर जीवदान देतो, त्याचप्रमाणे शिक्षक हे जीवनाला दिशा देणारे काम करत आहेत. शिक्षकांवर जास्त बंधने केली जाणार नाहीत.
शिक्षकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य
चंद्रपूरमधील पालडोह मधील शाळा ३६५ दिवस सुरु आहे. तोरणमाळ येथील शाळेला आदर्श निवासी शाळा पारतोषिक मिळाले आहे. शिक्षकांचे यासाठी समर्पण महत्वाचे आहे. ६१ हजार शिक्षकांसाठी ११ कोटी देण्याच निर्णय तात्काळ घेतला. शिक्षकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. शिक्षकांवर कुठल्याही प्रकारची बंधने आम्ही टाकणार नाही. शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. या स्पर्धात्मक युगात आपण सर्व पुढे गेलो पाहिजे.
महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी कामगिरी इंडेक्स मध्ये एकूण १००० गुणांपैकी महाराष्ट्राला ९२८ गुण मिळाले आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. यामध्ये शिक्षकांचं मोठे योगदान आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे अभिनंदन. कितीही तंत्रज्ञान आले तरी शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
३० हजार पदांची लवकर भरती
नविन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेवरील शिक्षणावर भर दिले जाईल. इंग्रजी गणित व विज्ञान या विषयांची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी. यासाठी आपल्या सर्वांचा प्रयत्न सुरु आहे. शिक्षण व्यवस्था दर्जेदार करण्यासाठी जी रिक्त पदे आहेत ती भरण्यात येणार आहेत. तसेच केंद्र प्रमुखाची रिक्त पदे भरण्याचे काम सुरु आहे. शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरले जातील. शिक्षकांच्या मागणीच्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु. असेही ते म्हणाले.
विशेष बाब म्हणून रजा मंजूर - मंत्री केसरकर
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री केसरकर म्हणाले, या शिक्षक समिती त्रेवार्षिक महाअधिवेशनाला राज्यातील सर्व शिक्षकांना उपस्थित राहता येईल यासाठी शासनाने तीन दिवसाची विशेष बाब म्हणून रजा मंजूर केली आहे. केंद्र प्रमुखाच्या बरेच जागा रिक्त आहेत. त्या सर्व जागा आपण शिक्षक भरती झाल्यानंतर येत्या ६ महिन्यात भरल्या जातील, असे आश्वासनही दिले. राज्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येईल. कोणीही विद्यार्थीं गणवेश अभावी वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.
प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागणी केली. यावेळी आबा शिंपी यांच्या स्वराज्याचं दीपस्तंभ आणि संदीप मगदूम याच्या लोकराजा छत्रपती शाहू महाराज या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सुरुवातीस यावेळी वेंगुर्ला शिक्षक वृंद यांनी स्वागत गीत गायन करुन मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी राज्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.