कबुलायतदार जमिनी हक्काबाबतचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावू : अब्दुल सत्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 04:28 PM2020-11-02T16:28:47+5:302020-11-02T16:30:47+5:30
AmboliHillStation, Land, AbdulSattar, Minister, sindhudurgnews जिल्ह्यातील चौकुळ, गेळे व आंबोली येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले कबुलायतदार जमिनी हक्काबाबतचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू. त्यासाठी शासन स्तरावर उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी येथे दिले.
आंबोली : जिल्ह्यातील चौकुळ, गेळे व आंबोली येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले कबुलायतदार जमिनी हक्काबाबतचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू. त्यासाठी शासन स्तरावर उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन महसूल राज्यमंत्रीअब्दुल सत्तार यांनी रविवारी येथे दिले.
आंबोली येथे कबुलायतदार गावकर जमीन वाटप समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सावंतवाडी सहायक वनसंरक्षक आय. डी. जळगांवकर, दिगंबर जाधव, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
महसूल राज्यमंत्रीअब्दुल सत्तार पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबुलायतदार गेली अनेक वर्षे जमीन हक्कासाठी शासनस्तरावर प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा अविरत लढा सुरूच असून हा लढा आता सत्यात उतरणार आहे. कबुलायतदारांचा हा प्रश्न निकाली निघाल्यानंतर त्यांच्या येणाऱ्या पिढीला ही बाब सुखकारक असणार आहे. त्यांचा हा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे.
कबुलायतदार यांना जमिनीचे वाटप करताना कोणावरही अन्याय न होता समान पद्धतीने त्यांना न्याय दिला जाईल. शासन आपल्या दरबारी येऊन आपल्या सर्वच प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहे. यापुढेही कबुलयातदारांचे निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.
जंगली प्राण्यांपासून उपद्रव टाळण्यासाठी उपाययोजना
कबुलायतदार यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री व उच्चस्तरीय अधिकारी यांची मंत्रालयात तातडीने बैठक आयोजित करण्यात येणार आहे, असेही महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. तसेच या भागात जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होेते. यासाठी सध्या जे जमीन कसत आहेत त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही व्हावी व वनविभागाने जंगली प्राण्यांपासून होणारे उपद्रव टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे यावेळी सत्तार म्हणाले.
अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार : केसरकर
आमदार केसरकर म्हणाले, गेली कित्येक वर्षे चौकुळ, गेळे, आंबोली येथील कबुलायतदार प्रश्न प्रलंबित होता. आम्ही सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले. आता हा प्रश्न अंतिम टप्यात आला आहे. कबुलायतदार प्रश्न सोडविण्यासाठी उच्च स्तरावर सर्व प्रकारची कार्यवाही पूर्ण होत आली आहे. त्यामुळे कबुलायतदार हे जमिनीचे हक्कदार होणार आहेत.
प्रश्न सुटल्यावर विविध योजनांचे, आपत्तीमुळे नुकसान झालेल्या त्यांच्या भरपाई बाबतचे लाभ त्यांना मिळण्यास ते पात्र होतील. तसेच इतर अनेक शासकीय योजनांचे लाभ संबंधिताना घेता येणार आहेत.