आठवडा बाजारासाठी आलेल्या वृद्धेला लुटले, आंबेलीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 05:09 PM2019-09-23T17:09:50+5:302019-09-23T17:10:57+5:30
दोडामार्ग येथील आठवडा बाजारात खरेदी करून घरी जाताना आंबेली-नूतनवाडी येथील सुभद्रा गोपाळ गवस (७५) या वृद्धेला अज्ञात चोरट्याने वाटेत अडवून तिच्या गळ््यातील सोन्याची माळ हिसकावून पलायन केले. यावेळी चोरट्याशी झालेल्या झटापटीत वृद्धा गंभीर जखमी झाली. तिच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. ही घटना रविवारी दुपारच्या दरम्यान घडली.
दोडामार्ग : येथील आठवडा बाजारात खरेदी करून घरी जाताना आंबेली-नूतनवाडी येथील सुभद्रा गोपाळ गवस (७५) या वृद्धेला अज्ञात चोरट्याने वाटेत अडवून तिच्या गळ््यातील सोन्याची माळ हिसकावून पलायन केले. यावेळी चोरट्याशी झालेल्या झटापटीत वृद्धा गंभीर जखमी झाली. तिच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. ही घटना रविवारी दुपारच्या दरम्यान घडली.
आंबेली-नूतनवाडी येथील सुभद्रा गवस ही वृद्धा दोडामार्गच्या आठवडा बाजारासाठी बाजारपेठेत आली होती. किरकोळ सामान खरेदी करून माघारी परत जाण्यासाठी ती एसटीमध्ये बसून आंबेली-नूतनवाडी येथील बस थांब्यावर उतरली. यावेळी बसच्या मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने आपली दुचाकी ती जात असलेल्या रस्त्याने वळविली.
काही अंतरावर गेल्यानंतर तो पुन्हा माघारी फिरला. वाटेने एकट्याच घरी जाणाऱ्या वृद्धेला त्याने थांबविले व मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने तिच्या गळ््यातील सोन्याची दीड तोळ््याची माळ खेचली. यावेळी तिने आरडाओरडा केली. मात्र, तिला ढकलून देत चोरट्याने पलायन केले.
यावेळी दोडामार्गच्या दिशेने येणाºया गवस हिच्या नातवंडांनी हे दृश्य लांबून पाहिले व त्यांनी धाव घेतली. त्यांनी अज्ञात चोरट्याचा पाठलाग केला पण तो हाती मिळाला नाही. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी घटनास्थळी येत गवस हिला रुग्णवाहिकेतून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तिच्या डोक्याला नऊ टाके घालण्यात आले असून, तिच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
आंबेली परिसरात भीतीचे वातावरण
यापूर्वीही अशीच एक घटना एका वृद्धेच्या बाबतीत घडली होती. तिच्या गळ््यातील सोन्याची माळ पाहून तिला एका अज्ञात व्यक्तीने आपल्या गाडीवर बसविले होते. रहदारी नसलेल्या रस्त्यावर नेऊन तिच्या गळ््यातील सोन्याची माळ हिसकावून चोरटा पसार झाला होता. अशी घटना पुन्हा घडल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.