दिव्यांग, अपंगांबाबतच्या निर्णयाचे स्वागत

By admin | Published: January 14, 2016 10:00 PM2016-01-14T22:00:25+5:302016-01-15T00:22:05+5:30

राज्य शासनाकडून अंमलबजावणी : पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिथीलता

Welcome to Divyaag, Disability decisions | दिव्यांग, अपंगांबाबतच्या निर्णयाचे स्वागत

दिव्यांग, अपंगांबाबतच्या निर्णयाचे स्वागत

Next

सिंधुदुर्गनगरी : विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग/अपंग) विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या होणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये सोयी सवलती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या युती शासनाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी निर्धारीत वेळेपेक्षा २० मिनिटे अधिक वेळ, अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत यासह विविध सुविधा शासनाने दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) म्हणजे अंशत: अंध अथवा पूर्णत: अंध, मतिमंद, कर्णबधीर, अस्थिव्यंग, बहुविकलांग, स्वमग्न, सरेब्रेल पाल्सी, अध्ययन अक्षम अशा सर्व विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत शिक्षण सर्वच गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. म्हणून या विद्यार्थ्यांचे इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने प्रत्येक घटकामध्ये मूल्यमापन होऊ शकत नाही. म्हणून त्यांच्या ज्ञानाच्या, भाषेच्या मूल्यमापनाच्या पद्धती सामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असणे अपेक्षित आहे. या दिव्यांग विद्यार्थ्यांना असलेल्या परीक्षा योजनेपेक्षा परीक्षा पद्धतीमध्ये काही सोयी सवलती देणे आवश्यक होते. या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शाळेत सामान्य मुलांबरोबर शिक्षण घेता यावे यासाठी प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते आठवीकरीता सर्व शिक्षा अभियान व नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान समावेशित शिक्षण माध्यमिक स्तर सुरु करण्यात आलेले आहे. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मूल्यमापनामध्ये गरजेनुसार सोयी सवलती देण्याबाबत शासन स्तरावरून समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोयी सवलती देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार भाजप व सेनेच्या युती शासनाने या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात विशेष सवलत दिली आहे. त्यानुसार कॅटेगरीनुसार शासनाने शैक्षणिक सवलतीचे निकष जारी केले आहेत. (प्रतिनिधी)


अंध विद्यार्थ्यांकरीता सवलती
पेपर सोडविण्यासाठी प्रति तास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील
नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला कमाल ३० गुणांची सवलत
आकृत्या, नकाशे काढण्याची सवलत
विज्ञान व तंत्रज्ञान या प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा देता येईल.
यासह १९ सवलती देण्यात आल्या आहेत.
कर्णबधीर विद्यार्थ्यांकरीता सवलती
प्रति तास ३० मिनिटे पेपर सोडविण्यासाठी जादा दिली जातील.
मौखिक मूल्य मापनासाठी लेखीचा पर्याय असावा.
मुलांसाठी स्पेलिंग, व्याकरण, विरामचिन्हे चुकांबाबत गुणदान कमी करण्यात येवू नये.
अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी सवलती
सोयीनुसार नजीकचे परीक्षा केंद्र
पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे
२० गुणांची सवलत
हातात दोष असल्यास या विद्यार्थ्यांना लेखनिक घेता येईल.
बहुविकलांग विद्यार्थ्यांकरीता सवलती
२० मिनिटे अधिक वेळ व २० गुणांची सवलत.
लेखनिक घेण्यास परवानगी.
यासह वरील नमूद केलेल्या आजारांवर शैक्षणिक सुविधांची सूट देण्यात आली आहे.

Web Title: Welcome to Divyaag, Disability decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.