WELCOME KONKAN : सिंधुदुर्ग : नव्या वर्षाचा सेलिब्रेशन करायचंय ? चला तर मग थेट कोकणात, पर्यटनाचे नवे अध्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 02:35 PM2017-12-23T14:35:13+5:302017-12-23T14:44:01+5:30
सरत्या वर्षाला निरोप द्यायचाय ?....नव्या वर्षाचा सेलिब्रेशन करायचंय ? चला तर मग थेट कोकणात.....येवा कोकण आपलाच आसा ! असे आदरातिथ्याने म्हणणारा कोकणी माणूस यावर्षीच्या नव्या सेलिब्रेशनसाठी आतुर झालाय. समुद्राच्या तळाखालील अद्भुत विश्वही पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सिद्धेश आचरेकर
मालवण : सरत्या वर्षाला निरोप द्यायचाय ?....नव्या वर्षाचा सेलिब्रेशन करायचंय ? चला तर मग थेट कोकणात.....येवा कोकण आपलाच आसा ! असे आदरातिथ्याने म्हणणारा कोकणी माणूस यावर्षीच्या नव्या सेलिब्रेशनसाठी आतुर झालाय. कोकण म्हटल तर अथांग समुद्रकिनारे आणि मनमोहन निसर्ग सौंदर्य हे आलेच.
अलीकडे या दोन कोकणच्या सौंदर्यासह समुद्राच्या तळाखालील अद्भुत विश्वही पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच लाखो पर्यटकांचा ओढा थेट कोकणात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणनगरीत असतो.
आॅक्टोबर महिन्यापासून सुरु झालेला पर्यटन हंगाम डिसेंबर महिन्यात चांगलाच बहरतो. सरत्या वर्षाला ह्यगुड बायह्ण आणि नूतन वर्षाला वेलकम करण्यासाठी पर्यटकांनी मागील दहा वर्षात मालवणला सर्वाधिक पसंती दिली आहे. पर्यटनाची नवनवी आव्हाने झेलणारे पर्यटन व्यावसायिकही पर्यटकांना खुष करण्यासाठी पर्यटन व्यवसायात नवनवे अध्याय आणत असून पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरतात हे विशेष.
सेलिब्रेशनची धूम
सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटकांनी मालवण किनारपट्टीला सर्वाधिक पसंती दिली आहे. पर्यटन महामंडळाची तारकर्ली एमटीडीसी ५ जानेवारीपर्यंत आगाऊ बुकिंगसह फुल झाली आहे. तारकर्ली, देवबाग, वायरी, दांडी चिवला व तळाशील-तोंडवळी किनारपट्टीवरील हॉटेलमध्येही पर्यटकांनी आगाऊ बुकिंग सुरु केले आहे. कृषी व धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणाºया पर्यटकांच्या स्वागतासाठी मालवण सज्ज झाले आहे.
सुविधायुक्त उडन हाऊस
कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून मालवणला पर्यटकांकडून सर्वाधिक पसंती दिली जाते. लाखोंच्या संख्येने मालवणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. राज्याबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत.
सीआरझेड कायद्यामुळे किनारपट्टी भागात बांधकामांवर येणारे निर्बंध लक्षात घेता उडन हाऊस या संकल्पनेतून अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त पर्यटन हाऊसची उभारणी केली असून पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत. अनेकांनी आपल्या हॉटेलमध्ये दर्जेदार सुविधा देण्यावर भर दिला आहे.
मालवणनगरी ५ जानेवारीपर्यंत हाऊसफुल
तारकर्ली एमटीडीसी १७ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत फुल झाली आहे. येथील २२ तंबू निवास व कर्ली खाडीतील दोन हाऊसबोट यांचा यात समावेश आहे. अनेक हॉटेलमध्ये आगाऊ बुकिंगची नोंद सुरु आहे. काही ठिकाणी पर्यटकांना विशेष पॅकेज दिली जात आहेत.
आॅनलाईन पद्धतीने बुकिंग करुन आगाऊ रक्कमही पर्यटकांकडून जमा केली जात आहे. मालवण पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी पर्यटन हंगामात शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्याकडे जादा पोलीस कुमक देण्याची मागणी केली आहे. प्रमुख मार्गावर वाहतूक पोलीस तैनात केले जाणार आहेत.
मज्जा लुटण्यासाठी बरेच पर्याय
मालवणला आल्यानंतर कोणताही पर्यटक हमखास किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन घेतोच. त्यानंतर पर्यटकांच्या पर्यटनाला सुरुवात होते. मग त्याच्यासाठी स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी नवनवे पर्यटन व्यवसाय सुरु केले आहेत. यात प्रामुख्याने वॉटरस्पोर्ट्स, पॅरासेलिंग, बोटिंग व स्कुबा डायव्हिंग या पर्यटन प्रकारांचा समावेश आहे.
मालवण, चिवला बीच, तारकर्ली खाडी, देवबाग आदी ठिकाणी पर्यटकांचीही मागील पाच ते सहा वर्षात सर्वाधिक पसंती राहिली आहे. गतवर्षी नोटाबंदीचा फटका पर्यटन व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला होता. तरीही नोटाबंदीच्या ग्रहणाला तोंड देत गतवर्षी व्यावसायिकांनी सी फूड फेस्टिवलचे आयोजन करून पर्यटकांना पुन्हा मालवणकडे वळते करून घेतले. याही वर्षी तुमचा मालवणलाच यायचा बेत असेल तर तुम्हाला फूड फेस्टिवल तसेच बीच फेस्टिवल, म्युझिकल नाईट आदी पर्याय उपलब्ध असणार आहेत.
सफर सी वॉटर पार्कची
पर्यटन व्यावसायिकांनी स्कुबा डायव्हिंगसारख्या महागड्या व्यावसायानंतर पुढाकार घेवून धाडसाचे पाऊल टाकत उभारलेला सी वॉटर पार्क हा प्रकल्प यावर्षीपासून प्रथमच पर्यटकांच्या सेवेत दाखल झाला आहे. सी वॉटर पार्क या प्रकल्पामध्ये व्यावसायिकांनी ३५ ते ४० लाखापर्यंत गुंतवणूक केली आहे. सी वॉटर पार्कची उभारणी करत असल्यापासून पर्यटकांना त्याचे मोठे आकर्षण होते.
मागील आठवड्यापासून सी वॉटर पार्क पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी नवा अध्याय म्हणून समोर येत आहे. तुम्हाला पर्यटनाचे चक्र पूर्ण करायचे असेल तर सी वॉटर पार्क भेट देवून तेथील अविस्मरणीय आनंद द्विगुणित कराच ! माफक दर आणि सुरक्षित पर्यटन हे सी वॉटर पार्कचे वैशिष्ट्य असून बच्चे कंपनीसह मोठ्या व्यक्तिंना सी वॉटर पार्कमध्ये खेळण्याबागडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तारकर्ली, देवबागही सज्ज
पर्यटनात मालवणच्या साथीने देवबाग व तारकर्ली तसेच वायरी हे सागरी किनारपट्टीवरील गावही पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे धूमधडाक्यात स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी २० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत आगाऊ बुकिंग केले आहे.
अचानक मालवणच्या दौचा बेत आखला तर राहण्यासाठी हॉटेल्स मिळणे कठीण आहे. जवळपास सर्व हॉटेल्स, लॉजचे संकेतस्थळ उपलब्ध असल्याने पर्यटकांनी आॅनलाईन बुकिंगला महत्व दिले आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पाच दिवसात सुमारे ५० हजाराहून अधिक पर्यटक येतील, असा अंदाज पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
पर्यटन करताना जीव सांभाळा
पर्यटकांना समुद्रस्नानाची मोठी उत्सुकता असते. तारकर्लीसारख्या स्वच्छ व मनमोहक समुद्रकिनारी समुद्रस्नान करत असताना अतिउत्साहीपणामुळे आजवर अनेक पर्यटकांना जीव गमवावे लागले आहे. यात प्रामुख्याने युवा वर्गाचा समावेश आहे. त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी आपली स्वत:ची सुरक्षितता व खबरदारी घेवूनच जीवाचे पर्यटन करावे.
स्थानिक पर्यटनाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नका. स्थानिकांशी वाद न घालता येथील पर्यटकांचा आनंद लुटत राहा. सुरक्षित समुद्रकिनारी समुद्रस्नान केल्यास पर्यटन अधिक बहरेल. प्रशासनाच्या अनास्थेमुळे किनारपट्टीवरील गावात वैद्यकीय सुविधा नसल्याने पर्यटकांनी स्वत:च जीव स्वत:च सांभाळणे गरजेचे असून स्थानिकांना सहकार्य करावे, हीच अपेक्षा !