सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्लेत नववर्षाचे दिमाखात स्वागत

By admin | Published: March 22, 2015 12:27 AM2015-03-22T00:27:54+5:302015-03-22T00:28:13+5:30

गुढीपाडव्याचे निमित्त : शहरवासीयांनी पारंपरिक वेशभूषेसह घेतला सहभाग; चित्ररथांचे आकर्षण

Welcome to Sawantwadi, Kudal, Vengurle, New Year | सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्लेत नववर्षाचे दिमाखात स्वागत

सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्लेत नववर्षाचे दिमाखात स्वागत

Next

सावंतवाडी/वेंगुर्ले/कुडाळ : गुढीपाडव्याच्यादिनी नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ आदी शहरांमध्ये काढलेल्या भव्य नववर्ष फेरींमध्ये शहरवासीयांनी पारंपरिक वेशभूषेसह उत्स्फूर्त सहभाग घेतला.
वेंगुर्लेवासीयांच्यावतीने मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त सजविलेल्या बैलगाडीसह मराठी पेहराव परिधान करून पारंपरिक पद्धतीने संस्कृतीचे दर्शन घडविणारी फेरी वेंगुर्ले शहरात काढून मराठी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. वेंगुर्लेची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर देवस्थानकडून मराठी नववर्ष पाडव्याच्यादिनी मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणारी फेरी काढण्यात आली. प्रथम श्री देव रामेश्वरास श्रीफळ ठेवून फेरीचा प्रारंभ करण्यात आला. या फेरीत शरद राऊळ यांच्या सजविलेल्या बैलगाडीमध्ये ढोल-ताशे त्याचबरोबर मराठी पेहराव, फेटे परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम यासह नव वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. या फेरीत महिला वर्गाचा मोठा सहभाग होता.
कुडाळवासीयांच्यावतीने भव्य फेरीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या फेरीचे उद्घाटन कुडाळ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या हस्ते श्री देव कुडाळेश्वर मंदिराकडे झाले. पानबाजारमार्गे बाजारपेठ, गांधी चौक, जिजामाता पुतळा येथून औदुंबरनगर येथील स्वामी समर्थ मंदिराकडे फेरीची सांगता झाली.
या फेरीमध्ये डोक्यावर फेटा, सदऱ्यांसह पुरुष तसेच महिलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभाग घेतला. तसेच भव्यदिव्य चित्ररथ, कोंबडी नाच, पारंपरिक ढोलपथक, पौराणिक रंगभूषा, भारतमातेची पालखी यासह मुलांचा नृत्याविष्कार फेरीचे आकर्षण ठरले.
सावंतवाडी येथे हिंदू नववर्ष स्वागत समितीद्वारे सावंतवाडी शहरात नववर्ष फेरी काढण्यात आली. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येथील संस्थानकालीन राजवाडा येथे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते गुढीपूजन व भारतामातेच्या प्रतिमेचे पूजन करून फेरीचा प्रारंभ करण्यात आला.
नगरपालिका, एसपीके महाविद्यालय, विश्रामगृह, जयप्रकाश चौक, विठ्ठल मंदिर, आत्मेश्वर मंदिर, गवळी तिठा, चितारआळी, उभाबाजार मार्गे गांधी चौकात या फेरीची सांगता करण्यात आली.
भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी आदी विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महिलांसह आबालवृध्दांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून फेरीत सहभाग घेतला. फेरीच्या मध्यभागी असलेली भारतमातेची प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. (प्रतिनिधी)

Web Title: Welcome to Sawantwadi, Kudal, Vengurle, New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.