ढेबेवाडीकरांनू... आपले कोकणात स्वागत असा!
By admin | Published: April 10, 2015 10:51 PM2015-04-10T22:51:40+5:302015-04-10T23:46:59+5:30
लवकरच सर्व्हे : महिंदमार्गे संगमेश्वर रस्त्याच्या हालचाली
बाळासाहेब रोडे - सणबूर -माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी ते महिंद या नऊ किलोमीटरच्या रुंदीकरणाचे काम गतीने सुरू आहे. येत्या पंधरा दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण होणार असून, हा रस्ता संगमेश्वरला जोडण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. त्यामुळे ढेबेवाडी विभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून झुकते माप दिले आहे. त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली विविध विकासकामे सध्या ढेबेवाडी विभागात गतीने सुरू आहेत. त्यामध्ये ढेबेवाडी ते महिंद हे नऊ किलोमीटर तर चाफेर ते संगमनेर हे दोन किलोमीटर अशा अकरा किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी सव्वाचार कोटी रुपये मंजूर आहेत. ३.७५ मीटरच्या या जुन्या रस्त्याचे साडेपाच मीटरने रुंदीकरण होत आहे. रस्त्याच्या कामासाठी काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांच्यासह राहुल चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरवा केला आहे. हे काम उत्कृष्ठ दर्जाचे असल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. ढेबेवाडी ते महिंद या नऊ किलोमीटरचा रस्ता १५ दिवसांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
ढेबेवाडी पासून पश्चिमेला असणारे वाल्मीक पठार पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहे. त्याच बरोबर भोसगाव जवळ निसर्ग पर्यटन केंद्र साकारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर वांग-मराठवाडी व महिंद या दोन धरणांमुळे भविष्यात पर्यटकांच्या गर्दीत वाढच होणार आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. त्यादृष्टीने ढेबेवाडी-महिंद हा रस्ता महत्त्वाचा मानला जात आहे. या रस्त्यामुळे सणबूर, महिंद, रुवले, बनपुरी, बाचोली या परिसरातील ग्रामस्थांना खराब रस्त्यामुळे होणारा त्रास कायमचा बंद होणार आहे. भविष्यात हा रस्ता कोकणातील संगमेश्वरलाही जोडण्यासाठी हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत.
हा रस्ता कोकणला जोडला गेल्यास संपूर्ण विभागाचा चौफेर विकास होणार आहे.
सळवे अखेरचे टोक
सळवे गाव हे ढेबेवाडी विभागाचे शेवटचे टोक आहे. या गावापासून पुढे एका बाजूला शिराळा तालुका व एका बाजूला रत्नागिरी जिल्ह्याची हद्द सुरू होते. सध्या रुंदीकरण होत असलेला ढेबेवाडी-सळवे हा रस्ता पुढे संगमेश्वरला जोडण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. सळवेपासून संगमेश्वरचे अंतर सुमारे सत्तर किलोमीटर आहे.
साठ कि.मी.चा प्रवास वाचणार
ढेबेवाडी खोऱ्यातील जनतेला सध्या संगमेश्वरला जाण्यासाठी ढेबेवाडीपासून पाटण व तेथून चिपळूणमार्गे संगमेश्वरला जावे लागते. हे अंतर सुमारे १२० किलोमीटरचे आहे. मात्र, ढेबेवाडी ते संगमेश्वर हा रस्ता झाल्यास ते अंतर साठ किलोमीटरचे असणार आहे. त्यामुळे साठ किलोमीटरचा प्रवास वाचणार आहे. महिंदपासून पुढे डोंगरातून बोगदा करून हा रस्ता करण्यात येणार आहे.
ढेबेवाडी ते संगमेश्वर हा रस्ता होण्यासाठी आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सातत्याने आग्रह धरला होता. त्याबरोबरच ढेबेवाडी खोरे कोकणशी जोडले जात असल्याने येथील बाजारपेठेला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.
- हिंदुराव पाटील, प्रांतिक प्रतिनिधी
खोऱ्यातील महत्त्वाचे मार्ग
ढेबेवाडी ते पाटण : २९ किलोमीटर
ढेबेवाडी ते कऱ्हाड : २७ किलोमीटर
ढेबेवाडी ते जिंती : १० किलोमीटर
ढेबेवाडी ते सळवे : ११ किलोमीटर
ढेबेवाडी ते काळगाव : १२ किलोमीटर