हत्तीच्या बंदोबस्तासाठी पश्चिम बंगालची टीम सिंधुदुर्गात, ..त्यानंतर प्रत्यक्ष मोहीम 

By अनंत खं.जाधव | Published: September 13, 2023 06:10 PM2023-09-13T18:10:54+5:302023-09-13T18:11:26+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर टीम कोल्हापूरमध्येही जाणार

West Bengal team to Sindhudurga for elephant settlement | हत्तीच्या बंदोबस्तासाठी पश्चिम बंगालची टीम सिंधुदुर्गात, ..त्यानंतर प्रत्यक्ष मोहीम 

हत्तीच्या बंदोबस्तासाठी पश्चिम बंगालची टीम सिंधुदुर्गात, ..त्यानंतर प्रत्यक्ष मोहीम 

googlenewsNext

सावंतवाडी : कर्नाटकमधून सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या जंगली हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्र शासन पुढे सरसावले आहे. या हत्तीचा अभ्यास करण्यासाठी पश्चिम बंगाल मधील रेसक्यू टीम मंगळवारीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात दाखल झाली. ही टीम हत्तीबाधित क्षेत्राचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर ते कोल्हापूर जिल्ह्यातही हत्ती बाधित गावांना भेटी देणार आहेत. या टीमचे नेतृत्व सॅडनिक दासगुप्ता हे करीत असून टीममध्ये तेरा जणांचा समावेश आहे.

वीस वर्षापूर्वी कर्नाटकच्या जंगलातून तिलारीच्या क्षेत्रात हत्तीचा कळप आला होता. या हत्तींनी मोठ्या प्रमाणात शेती बागायतीचे नुकसान केले. तसेच हत्तीच्या हल्यात अनेकांना आपला प्राण ही गमवावा लागला होता. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत हत्ती बॅक टू होम ही मोहिम दोडामार्ग तालुक्यात राबविण्यात आली होती. मात्र ती मोहीम अयशस्वी ठरली.

 त्यानंतर पुन्हा एकदा कुडाळ तालुक्यातील माणगावच्या जंगलात हत्ती पकड मोहीम राबविण्यात आली ती यशस्वी ठरली खरी, पण त्यात दोन हत्तींना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत एकही मोहीम राबविण्यात आली नव्हती. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून हत्तींचा मोठ्याप्रमाणात उपद्रव वाढला असून दोडामार्ग तालुक्यातील तिलारी बुडीत क्षेत्रासह आठ ते दहा गावात हत्तीनी नुसता धुमाकूळ घातला आहे.
शेतकऱ्यांच्या बागायती उध्वस्त केल्या असून घराचे ही नुकसान केले यामुळे स्थानिकांच्या उद्रेकाला वनाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. या विरोधात अनेक आंदोलने ही झाली.

त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे हत्तीचा बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी केली. या मागणीला वनमंत्र्याकडून हिरवा कंदील दाखवल्यानंतर पश्चिम बंगाल येथून खास रेसक्यू टिम बोलविण्यात आली आहे.

ही तेरा जणांची टीम सॅडनिक दासगुप्ता याच्या नेतृत्वाखाली दोन दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली असून दोडामार्ग तालुक्यातील हत्ती बाधित क्षेत्राचा टिम अभ्यास करणार आहे. तसेच येथील उपवनसंरक्षक एस.एन रेड्डी यांना आपला अहवाल देणार आहेत त्यानंतर ती टीम कोल्हापूर जिल्ह्यातही जाणार आहे.

सध्या फक्त अभ्यास मोहीम 

पश्चिम बंगाल मधील जी टिम आली आहे.ती सध्या हत्तीबाधीत क्षेत्राचा अभ्यास करणार असून हत्तीना कशा प्रकारे परतवून लावू शकतो हे ते बघणार आहेत. ही टीम संपूर्ण परिसर फिरणार आहे. त्यानंतर आम्हाला अहवाल देणार आहेत अशी माहिती सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस.एन रेड्डी यांनी लोकमतला दिली.

Web Title: West Bengal team to Sindhudurga for elephant settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.