ठेकेदाराचा कळवळा का ?

By admin | Published: August 30, 2016 10:49 PM2016-08-30T22:49:45+5:302016-08-30T23:53:13+5:30

भालचंद्र साठेंचा जठारांना सवाल : नौटंकीबहाद्दरांची ताकद राज्याने अनुभवलीय

What is the contractor's compassion? | ठेकेदाराचा कळवळा का ?

ठेकेदाराचा कळवळा का ?

Next

वैभववाडी : आमदार नीतेश राणे यांची ताकद संपूर्ण राज्याला माहित असून त्यांची हिमंत डंपर आंदोलनात सर्वांनी अनुभवली आहे. त्यामुळे प्रमोद जठारांसारख्या नौटंकी बहाद्दरांनी नीतेश राणेंना आव्हान देऊ नये, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित असताना पोपटपंची करण्यात पटाईत असलेल्या जठारांना धरणाच्या ठेकेदाराचा कळवळा का? असा सवाल साठे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
आमदार नीतेश राणे यांनी अरुणा प्रकल्पाचा ठेकेदार ‘महालक्ष्मी इन्फ्रा’च्या कार्यालयाला शनिवारी टाळे ठोकले. त्यामुळे सोमवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा काँग्रेसने मंगळवारी पत्रकार परिषदेत समाचार घेतला.
यावेळी बांधकाम सभापती दिलीप रावराणे, सभापती शुभांगी पवार, उपसभापती बंड्या मांजरेकर, नासीर काझी, युवक तालुकाध्यक्ष हुसेन लांजेकर, जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता चोरगे, बाळा हरयाण, स्वप्नील खानविलकर, रितेश सुतार आदी उपस्थित होते.
भालचंद्र साठे पुढे म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सरकार सोडवायला तयार नसल्याने त्यांनी नीतेश राणेंना बैठक घेण्याची विनंती केली होती. पुनर्वसनाच्या कामाची काहीच प्रगती नसताना धरणाच्या पिचींगचे काम मात्र दोन वर्षे सुरु आहे. त्यामुळेच ठेकेदाराच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय शासन प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची दखल घेणार नाही. याची खात्री झाल्यामुळेच आमदार राणे यांनी टाळे ठोकले.
परंतु, ठेकेदाराचा जठारांना एवढा कळवळा का यावा. ते आमदार असताना त्यांना ठेकेदाराकडून आर्थिक लाभ होत होता की काय? असे प्रश्न साठे यांनी उपस्थित केले. ते पुढे म्हणाले, भू-भाडे देताना ठेकेदार सहमतीपत्रावर जमीनदारांच्या सह्या घेत आहे.
कालवे किंवा धरणाच्या उत्खननासाठी लागणारी जमीन कंपनीच्या नावावर खरेदी करून ठेकेदार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीत ठेकेदार जबरदस्तीने उत्खनन करीत आहे. तरीही सत्ताधारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार ठेकेदाराची बाजू घेतात याचे आश्चर्य वाटते.
आमदार नीतेश राणेंची कृती स्टंटबाजी म्हणता मग पंचायत समिती इमारतीचा विषय ज्या पध्दतीने हाताळला ती जठारांची स्टंटबाजी नव्हती का? त्या ठेकेदाराने प्रमोद जठार आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही दिले नाही; म्हणून तो विषय त्यांनी पेटवला काय? असा सवालही भालचंद्र साठे यांनी यावेळी उपस्थित केला. (प्रतिनिधी)

संघर्ष समितीमुळेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न रेंगाळले
अरुणा प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर २00७ मध्ये प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठबळाची गरज नाही. आमचे प्रश्न आम्हीच सोडवू, अशी भूमिका प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीने घेतली होती. ती भूमिका घेणारे रंगनाथ नागपच होते. संघर्ष समितीची भूमिका नारायण राणे यांच्या कानावर गेल्यामुळे त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच अरुणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न रखडले. तेच रंगनाथ नागप आता प्रमोद जठारांच्या मांडीवर बसून बोलत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व अन्य प्रश्न रखडण्यास संघर्ष समितीची ती भूमिका आणि पर्यायाने रंगनाथ नागप हेच जबाबदार आहेत, असे भालचंद्र साठे यांनी स्पष्ट केले.


धरणावर जठारांच्या मशिनी असल्याचा संशय
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी काँग्रेस पक्षाच्या दुकानदारीची काळजी करु नये. त्यांनी स्वत:च्या राजकीय भवितव्याचे बघावे, असा सल्ला बांधकाम सभापती दिलीप रावराणे यांनी दिला आहे. जठार यांनी प्रकल्पग्रस्तांना सोडून ठेकेदाराची बाजू घेतल्यामुळे धरणावर प्रमोद जठारांच्या मशीनरी भाड्याने असल्याचा आम्हाला संशय येतो. त्यामुळेच ठेकेदाराचे काम बंद राहीले तर मशीनरीचे भाडे बुडण्याची भीती वाटत असल्यानेच जठार ठेकेदाराची बाजू घेत असावेत, असा आरोप दिलीप रावराणे यांनी केला आहे.

Web Title: What is the contractor's compassion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.