सत्तेत राहून सेनेने मच्छिमारांसाठी काय केले? : नीतेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:24 PM2019-01-31T23:24:30+5:302019-01-31T23:26:39+5:30
शिवसेनेने २०१४ च्या निवडणुकांमध्ये राणेंच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून मच्छिमारांवर अन्याय केल्याचा प्रचार केला. मात्र, सत्तेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत मच्छिमारांचे प्रश्न आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी किती सोडविले? हे त्यांनी जाहीर करावे.
कणकवली : शिवसेनेने २०१४ च्या निवडणुकांमध्ये राणेंच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून मच्छिमारांवर अन्याय केल्याचा प्रचार केला. मात्र, सत्तेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत मच्छिमारांचे प्रश्न आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी किती सोडविले? हे त्यांनी जाहीर करावे. केवळ मत्स्यमंत्र्यांना निवेदन देऊन पुन्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मच्छिमारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न वैभव नाईक करीत असल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.
कणकवली येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील फरक काय असतो? याचे उदाहरण म्हणजे मच्छिमारांचा प्रश्न आहे. २०१४ मध्ये विरोधात असलेल्या शिवसेनेने सत्तेत येण्यासाठी सिंधुदुर्गातील किनारपट्टीवरील मच्छिमारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविला होता. मच्छिमारांचे प्रश्न तत्कालीन मंत्री असलेले नारायण राणे व त्यांचे सत्तेतील सहकारी सोडवू शकले नाहीत असे सांगून मच्छिमारांमध्ये विरोधाचे वातावरण तयार केले. पारंपरिक मच्छिमारांना न्याय मिळवून देणार, अनधिकृत मच्छिमारी बंद करणार, डिझेल परतावा मिळवून देणार, मच्छिमारांसाठी संरक्षण कायदा करणार यासह विविध प्रश्नांबाबत आश्वासने देत मच्छिमारांची मते शिवसेनेने मिळविली.
मग त्यानंतरच्या ५ वर्षांत सत्तेत असलेल्या शिवसेनेने मच्छिमारांची परिस्थिती बदलली का? असा सवाल करतानाच आमदार वैभव नाईक यांनी विरोधी पक्षातील आमदारांप्रमाणे मंत्र्यांना निवेदन देऊन मच्छिमारांची दिशाभूल करू नये. कारण, जानेवारी २०१८ मध्ये मच्छिमारांच्या १० प्रश्नांवर मंत्री जानकर यांना मीदेखील निवेदन दिले होते. मात्र त्याची जाहिरातबाजी केली नव्हती, असा उपरोधिक टोला आमदार नीतेश राणे यांनी लगावला.
मच्छिमारांची मते मिळवून सत्ता मिळविली, आम्हांला सत्ता द्या. तुम्हांला न्याय मिळवून देऊ असा शिवसेनेने प्रचार केला. मत्स्य खात्याचे राज्यमंत्री शिवसेनेचे अर्जुन खोतकर आहेत. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत तर आमदार वैभव नाईक अशी शिवसेनेची मंडळी सत्तेत असूनदेखील मच्छिमारांना त्याचा काय फायदा झाला? केवळ मच्छिमारांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचे काम वैभव नाईक करीत आहेत.
मच्छिमारांच्या संरक्षणासाठी अद्यापही गस्तीनौका मत्स्य आयुक्तांकडे नाहीत. मच्छिमारांना शिवसेना सत्तेत राहून न्याय देऊ शकली नाही. त्याविरोधात देवगडमधील मच्छिमार २ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाºयांना भेटले आहेत. तसे निवेदन सादर करून येत्या आठ दिवसांत मच्छिमारांचे प्रश्न सुटले नाहीत तर सरकारला जिल्ह्यातील मच्छिमार जाब विचारणार आहेत. त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी मच्छिमारांची असून आम्ही सरकारच्या विरोधात मच्छिमारांच्या बाजूने आवाज उठवू, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी यावेळी दिला.
शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग!
शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बसून सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. सत्तेचा दबाव टाकून काही अनधिकृत बैठका जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेतल्या जात आहेत. पक्षीय कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपयोग शिवसेनेची नेतेमंडळी करीत आहेत. जिल्हाधिकाºयांना माहिती नसलेली बैठक आयोजित केली जाते. ही सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक आहे. असाच प्रकार वाघोटण गावातील एका विषयासंदर्भात झाला आहे. त्यावेळी चुकीच्या पद्धतीने बैठकीचे आयोजन केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात मी जिल्हाधिकाºयांशी बोलल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांचे पितळ उघडे पडले असून काही बैठका रद्द करण्यात आल्या. या पुढील काळात शिवसेनेच्या नेत्यांकडून सत्तेचा दुरुपयोग करत दबावासाठी बैठका लावल्यास त्या उधळून लावल्या जातील असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी यावेळी दिला .