तपासणी नाक्यांवर चालतंय तरी काय ?
By admin | Published: June 7, 2014 12:28 AM2014-06-07T00:28:06+5:302014-06-07T00:35:38+5:30
अवैध वृक्षतोड : सव्वा वर्षात गुन्हा नाही; माहिती अधिकारात उघड
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यातील सातही तपासणी नाक्यांवर गेल्या सव्वा वर्षात वृक्षतोड बंदी असताना एकही गुन्हा दाखल नाही, असा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारात पुढे आला आहे. ही माहिती भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष जयंत बरेगार यांनी दिली आहे. यामुळे वनांचे संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेले तपासणी नाके हे वसुली नाके बनले आहेत की काय, अशी शंका येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याबाबत माहिती अशी की, वनांचे संरक्षण करण्यासाठी तसेच वन्य प्राणी यांची इत्थंभूत माहिती मिळण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत. हे तपासणी नाके कोनाळ, बांदा, फोंडा, खारेपाटण, करूळ, आंबोली, आंबेरी आदी भागांत आहेत, पण हे सर्व तपासणी नाके सध्या वनविभागाच्या वसुलीचे प्रमुख साधन बनले असल्याची चर्चा आहे. त्यासाठी साखळी कार्यरत असल्याचे सांगितले जाते. या सात तपासणी नाक्यांबाबत माहितीच्या अधिकारात माहिती उघड झाली आहे की, सर्वत्र वृक्षतोड बंदी असताना गेल्या सव्वा वर्षात या तपासणी नाक्यांवरून मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड वाहतूक होत असतानाही एकही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याबाबत अश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत खात्री केली असता, अनेक तपासणी नाक्यावरील कर्मचारी कार्यालयात बसून असतात. असे असतानाही तत्कालीन उपवनसंरक्षक तुकाराम साळुंखे यांनी नव्याने आणखी सात नाकी प्रस्तावित केली आहेत. तसा प्रस्ताव शासनदरबारी पाठविला आहे. यात दोडामार्ग, कोलगाव, काळसे, आचरा, बेळणे, मठ, आरवली या ठिकाणी नाकी प्रस्तावित करण्यात आली आहेत. लाकूड वाहतुकीतून जादा ‘महसूल’ प्राप्त व्हावा, हाच यामागचा उद्देश असल्याचा संशय नागरिकांतून व्यक्त केला जात आहे, असे बरेगार यांनी सांगितले.
नाक्याचा वापर माहिती केंद्रासाठी व्हावा : बरेगार
जयंत बरेगार यांनी ही सर्व माहिती शासनाकडून माहितीच्या अधिकारात मिळविली आहे. त्यांनी सांगितले की, वन नाकी हा प्रकार कुणालाच पटत नाही. या नाक्याचा उपयोग शासनाने जे वन्य प्राणी जनतेला त्रास देतात. त्यांच्या माहिती केंद्रांसाठी करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच नवीन नाक्याना मंजुरी देऊ नये, असेही ते म्हणाले.
काम कुडाळात, मुक्काम सावंतवाडीत
कुडाळ येथे संरक्षक वनरक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याबाबत अनेक तक्रारी आहेत. हा कर्मचारी सावंतवाडीत राहतो. मात्र, काम कुडाळात व निवासभत्ताही कुडाळातीलच घेतो. याबाबत उपवनसंरक्षकाकडे तक्रार होऊनसुद्धा त्या कर्मचाऱ्याची चौकशी स्थानिक अधिकाऱ्याने गुलदस्त्यात ठेवली आहे.
एका नाक्यावर ट्रकमागे चारशे रुपये
जिल्ह्यातील कुठल्याही नाक्यावरून लाकूड वाहतूक केल्यास एका नाक्यावर शिक्का मारण्यासाठी चारशे रुपये मोजावे लागत आहेत. आंबोली येथे याचा प्रत्यय अनेकांना येतो. कागदपत्रे नको, पैसे द्या आणि लाकूड घेऊन जा, आमचे देणे-घेणे नाही, असाच कर्मचाऱ्यांचा रुबाब असतो, असे सांगितले जाते.(प्रतिनिधी)