रेडी बंदराची बाजू घेण्याचे कारण काय?
By Admin | Published: June 28, 2015 11:09 PM2015-06-28T23:09:20+5:302015-06-29T00:24:53+5:30
मालवणातील बैठकीत राजन तेली यांचा काँग्रेसला सवाल
मालवण : सहा वर्षे झाली तरी रेडी बंदराचे काम अपूर्णावस्थेत आहे. रेडी बंदर विकासकाने अंदाजपत्रकानुसार केलेले नसताना काँग्रेसचे नेते या बंदराविषयी बाजू घेण्याचे कारण काय? रेडी बंदरासाठी जेवढी तसदी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली त्याऐवजी तोंडवळी वायंगणी येथील सी वर्ल्ड प्रकल्पाविषयी घेतली असती तर जनतेचा फायदा झाला असता असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी मालवण येथील पत्रकार परिषदेत लगावला.
मालवण तालुका भारतीय जनता पार्टीची बैठक प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पार पडली. यावेळी राजन तेली यांचा भाजपाच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तेली बोलत होते. तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, विलास हडकर, भाऊ सामंत, गजानन ठाकूर, अॅड. पूर्वा ठाकूर, धोंडी चिंदरकर, गोपी पालव, संतोष लुडबे, आबा कुर्ले, सदाशिव राऊळ आदी उपस्थित होते.
तेली म्हणाले, रेडी बंदराचे काम ज्या विकासकाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अंदाजपत्रकानुसार पूर्ण न केल्याने नागरिकांचा विरोध आहे. असे असताना काँग्रेसचे नेते रेडी बंदराचे समर्थन करत बाजू घेतात याचा अर्थ काय? काँग्रेसची सर्व मंडळी आजूबाजूची कामे घेऊन ठेकेदारीमध्ये गुंतली आहेत. रेडी बंदराऐवजी सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत तसदी घेतली असती तर त्याचा फायदा नागरिकांना झाला असता. सत्तेत असताना सी वर्ल्डविषयी नागरिकांशी चर्चा करण्याचे सौजन्य काँग्रेसच्या नेत्यांनी दाखविले नाही. भाजप युती सत्तेत आल्यावर काँग्रेसच्या कालावधीत खितपत पडलेले तिलारी वनटाईम सेटलमेंट हत्तीचा प्रश्न, चौपदरीकरण, आकारफोड, वनसंज्ञा आदी प्रश्न मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न झाले. आज कोकणला योग्य दिशा मिळत असताना काँग्रेसचे नेते दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचे तेली यांनी सांगितले. सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकल्पांना चालना देण्याचे काम भारतीय जनता पक्ष करेल.
आरोंदा जेटीविषयी आपल्यावर वैयक्तिक पातळीवर काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केले. जमीन खरेदी अन्य कोणत्याही संदर्भात सीआयडीच काय तर जगातली कुठल्याही यंत्रणेमार्फत माझी चौकशी करावी. मात्र याचबरोबर चिपी विमानतळानजीकची जागा पेन्सिल नोंद कशी झाली व कोणी केली याचीही चौकशी व्हावी असे तेली यांनी सांगितले. (प्रतिनिधी)