विकासाच्या घोषणाशिवाय काय केले?, रूपेश राऊळांचा मंत्री केसरकरांना सवाल
By अनंत खं.जाधव | Published: March 17, 2023 04:58 PM2023-03-17T16:58:54+5:302023-03-17T17:44:48+5:30
जनतेला फसवणाऱ्या केसरकरांचा पराभव हेच ध्येय
सावंतवाडी : कोणतेही सरकार आले तरी रस्ते पाणी हा विकास होतच राहतो. पण तुम्ही मंत्री होऊन आठ महिने झाले एक तरी भरीव विकास काम दाखवून द्या. मल्टिस्पेशालिटी रूग्णालय तसेच सुरक्षा मंडळ, बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी, बस स्थानक यांचे काय झाले. येथील जनतेने विकासाच्या नावावर गप्पा ऐकायच्या का? असा सवाल शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी मंत्री दीपक केसरकर यांना केला आहे.
येत्या आठ दिवसात केसरकर यांच्या विकास कामांचा पंचनामा करू अन्यथा रस्त्यावर उतरू. जनतेला फसवणाऱ्या केसरकरांचा पराभव हेच ध्येय असल्याचे राऊळ यांनी सांगितले आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, रश्मी माळवदे, सुनिता राऊळ, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
राऊळ म्हणाले, खोटं-नाटं करून मंत्रिपदे मिळविलेल्या केसरकरांनी गेल्या पंधरा वर्षात काहीही केले नाही. उलट आमदार नाईक यांनी मंत्री पदाची अपेक्षा न ठेवता बरीचशी विकास कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन केसरकारांनी आता तरी आपल्या मतदारसंघाचा विकास करावा, केसरकारांनी केवळ भूमिपूजनाचे नारळ फोडले मात्र सुरू केलेली सर्व विकास कामे अर्धवट ठेवली आहेत. येथील बस स्थानकाचे काम २०१७ पासून सुरू आहे. मात्र आजही ते पूर्ण होऊ शकले नाही. तर दुसरीकडे नाईक यांनी आपल्या मतदारसंघातील कुडाळ, ओरोस आणि मालवण येथील बस स्थानकाची कामे जलद गतीने मार्गी लावल्याचे राऊळ म्हणाले.
स्व:ता कसला विकास केला नाही, आणि दुसऱ्यालाही करू दिला नाही. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी येथील मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी चार बैठका बोलावल्या होत्या. मात्र केसरकरांच्या श्रेय घेण्याच्या बालिश हट्टामुळे या बैठका झाल्या नाहीत. खासदार विनायक राऊत सुद्धा जन हिताचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळी केसरकर यांनी आपल्या मतदारसंघात कोणी ढवळाढवळ करू नये, असे सांगून खो घातला. स्वतः काही करायचे नाही, आणि दुसऱ्यालाही काही करू द्यायचे नाही, ही केसरकर यांची नियत राहिली आहे. आणि त्याचा फटका सर्व सामान्य माणसाला बसत असल्याचे राऊळ म्हणाले.