विरोधकांचा छुपा प्रचार; मंत्री रविंद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या
By अनंत खं.जाधव | Published: November 8, 2024 03:04 PM2024-11-08T15:04:23+5:302024-11-08T15:09:03+5:30
सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातील काही पदाधिकारी अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यासह उद्धवसेनेचे उमेदवार राजन तेली यांचा छुपा प्रचार करत ...
सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातील काही पदाधिकारी अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यासह उद्धवसेनेचे उमेदवार राजन तेली यांचा छुपा प्रचार करत असल्याचे समोर आले. याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी थेट सावंतवाडी गाठत कार्यकर्ते व पदाधिकारी यांना चांगलाच दम भरला तसेच छुपा प्रचार करणाऱ्याना थेट कानपिचक्या दिल्या. बांधकाम मंत्र्याच्या आक्रमक पावित्र्याने अनेक नेत्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे आश्वासन दिले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची महायुतीची बैठक काल, गुरूवारी सायंकाळी उशिरा झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, लखमसावंत भोसले, संजू परब आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
मागील काही दिवसापासून भाजपचे काही पदाधिकारी हे अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या प्रचारात छुप्या पद्धतीने सक्रिय होते. याबाबतच्या अनेक तक्रारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचल्या होत्या. त्यामुळे तातडीने मंत्री चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी उशिरापर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद निहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या.