लाच घेताना पोलिसासह मध्यस्थी जाळ्यात
By Admin | Published: July 2, 2016 11:48 PM2016-07-02T23:48:43+5:302016-07-02T23:48:43+5:30
कुडाळात ‘लाचलुचपत’ची कारवाई : गुन्ह्यात नाव न अडकविण्यासाठी मागितली लाच
कुडाळ : मुळदे येथील चोरीच्या गुन्ह्यात नाव अडकविण्याची धमकी देत नाव न अडकविण्यासाठी पाच हजारांची लाच मागून त्यापैकी रोख चार हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना कुडाळचे पोलिस शंकर नाईक व मध्यस्थी प्रमोद सावंत या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी दुपारी कुडाळ पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर करण्यात आली. या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एप्रिल महिन्यात तालुक्यातील मुळदे गावातील विहिरीवर लावलेले चार पंप चोरीला गेले होते. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली होती. या चोरीच्या प्रकरणात मुळदे येथील शंकर ऊर्फ महेश शिंदे याचे नाव अडकविण्यात येईल, अशी धमकी कुडाळ पोलिस ठाण्याचे वाहतूक शाखेतील पोलिस नाईक शंकर नाईक यांनी महेश शिंदे याला दोन महिन्यांपूर्वी दिली होती.
या प्रकरणात पैसे घेण्यासाठी मुळदे येथील प्रमोद सावंत (वय ३३) याला पोलिस नाईक यांनी मध्यस्थी म्हणून ठेवले होते. ही रक्कम यावेळी सावंत यानेच स्वीकारली होती. अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक चिंदरकर यांनी दिली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर चिंदरकर यांच्यासह पोलिस निरीक्षक मितेश केणी, युवराज सरनोबत, सहाय्यक पोलिस कर्मचारी जळवी, परब, देवळेकर यांनी केली. (प्रतिनिधी)
शिंदे यांनी दिली तक्रार
गेल्या दोन महिन्यांपासून गुन्ह्यात नाव न अडकविण्यासाठी पाच हजारांची मागणी करून त्रास दिल्यामुळे वैतागलेल्या शिंदे यांनी याबाबतची तक्रार कुडाळ येथील सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे ३० जून रोजी केली होती. ३० जून रोजी शिंदे यांनी तक्रार दाखल करताच लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तत्काळ या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा, याकरिता सर्व यंत्रणा कार्यान्वित केली. यादरम्यान पोलिस नाईक यांचा फोनही टॅपिंग करण्यात आला होता.
या वर्षातील पाचवी कारवाई
लाचलुचपत विभागाने यंदाच्या वर्षी ही केलेली पाचवी कारवाई असून, कुडाळ पोलिस ठाण्याचा पोलिस कर्मचारी पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने पुन्हा एकदा कुडाळ पोलिस चर्चेत आले आहेत.