अंधांप्रती शासन डोळस कधी होणार ?

By admin | Published: December 15, 2015 09:52 PM2015-12-15T21:52:06+5:302015-12-15T23:28:50+5:30

स्नेहज्योती विद्यालय : तुटपुंज्या मानधनावर जगणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ

When will the blind rule begin? | अंधांप्रती शासन डोळस कधी होणार ?

अंधांप्रती शासन डोळस कधी होणार ?

Next

शिवाजी गोरे -- दापोली -समाजातील अंध मुलांना डोळसपणे जगता यावे, यासाठी स्नेहज्योती घराडी अंध विद्यालयात १३ वर्षांपासून तूटपूंज्या मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांची उपासमार होत आहे. कोकणातील एकमेव अंध विद्यालयाचा अनुदान प्रस्ताव गेली ३ वर्षे मंत्रालयात पडून असल्याने शासन अंध विद्यालयांप्रती डोळस कधी होणार, असा सवाल शिक्षक करू लागले आहेत. ४ जानेवारी लुई ब्रेल जयंती दिनी शिक्षकांनी उपोषणाला बसण्याची तयारी सुरू केली आहे.
कोकणातील अंध मुलांना डोळस मुलांच्या शाळेत पाठविण्यास पालक इच्छूक नसतात, डोळस मुलांच्या शाळेत अंध मुलांची गैरसोय होते. त्यांना शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नसतात. यामुळे समाजातील अंध मुले शिक्षणापासून वंचित राहात होती. अशा अंध मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या आशाताई कामत व प्रतिभा सेनगुप्ता या दोन भगिनींनी घराडी येथे २००२ साली स्नेहज्योती अंध विद्यालयाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात अंधांसाठी वेगळी अंधशाळा असते, ही कल्पना अंध मुलांच्या पालकांना न पटण्यासारखी होती. अंध मुलांच्या शाळेत मुलांना पाठविण्यास पालक तयार नव्हते. अंध मुले शाळा शिकून काय करणार, त्यांना शाळेत कशाला पाठवायचे? तुम्ही त्यांना काय शिकवणार, त्यांना कोण सांभाळणार असे अनेक प्रश्न व समस्यांचा भडिमार पालकांकडून होत होता. त्याही परिस्थितीत या दोन बहिणींनी अंध मुलांच्या पालकांची गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. कोकणात सर्वत्र पायपीट करुन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला केवळ ३ मुले या शाळेत दाखल झाली होती. आज या शाळेत ४४ मुले आहेत. गेल्या १३ वर्षात शाळेने खूप प्रगती केली आहे. या शाळेत इयत्ता आठवीपर्यंतचे वर्ग चालतात. १३ वर्षांपूर्वीपासून या शाळेत २०० रुपये मानधनावर काम करणारे शिक्षक आहेत. या शाळेतील शिक्षकांना सुरुवातीच्या काळात मानधन देण्याएवढेही रुपये या संस्थेकडे नव्हते.
अशा बिकट परिस्थितीत समाजातील दानशूर व्यक्तींच्या देणगीतून शाळा कशीबशी सुरु आहे. परंतु या विद्यालयात शिक्षक, पहारेकरी, शिपाई, स्वयंपाकी आदी काम करणारे कर्मचारी १३ वर्षापासून अगदी तूटपूंज्या मानधनावर काम करीत आहेत.

किती दिवस देणगीवर?
स्नेहज्योती अंध विद्यालयातील अंध मुलांना डोळस करुन त्यांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत पेटवू पाहणाऱ्या शिक्षकांचे भविष्यच अंधकारमय बनल्याने शासनाकडे व संस्थेकडे वारंवार पाठपुरावा करुन दमलेल्या शिक्षकांनी शेवटचा पर्याय म्हणून ४ जानेवारी लुई ब्रेल जयंती दिनी मंडणगड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार पाठपुरावा करुनसुद्धा अनुदानाची फाईल पुढे सरकत नाही. शाळेला सरकारी अनुदान नसल्याने लोकांच्या देणगीवर किती दिवस काढायचे असा सवाल शिक्षक करीत आहेत.

अनुदान प्रस्ताव धूळखात
स्नेहज्योती अंध विद्यालय, घराडी (अनुदान प्रस्ताव क्र. इडीडी - २०१३ / प्र. क्र. २७७, अ. क्र. -१) हा प्रस्ताव मंत्रालयात ३ वर्षे धूळ खात पडून आहे.
स्मरणपत्र
२३/६/२०१५ रोजी सहसचिव सामाजिक न्याय व विशेष न्याय विभाग मंत्रालय विस्तार भवन, मुंबई यांना स्मरणपत्र देवूनही सकारात्मक प्रतिसाद नाही.
भारतरत्न सचिन तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा या शाळेला अलिकडे भेट देऊन अनुदान प्रस्तावाकडे लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते.


कोकणातील एकमेव अंध शाळेचा अनुदान प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात.
शिक्षक उपोषणाच्या तयारीत.
१३ वर्षे तूटपुंज्या मानधनावर केली जातेय सेवा.
४ जानेवारी लुई ब्रेल यांच्या जयंती दिनी शिक्षकांचे उपोषण.
प्रस्ताव पाठवून झाली तीन वर्षे.
वाढत्या महागाईमुळे शिक्षकांसमोर कुटुंबांचा गंभीर प्रश्न उभा.
तेरा वर्षे परिस्थितीशी संघर्ष.

Web Title: When will the blind rule begin?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.