उद्यानाचे स्वप्न पूर्ण होणार केव्हा?

By admin | Published: January 3, 2016 12:29 AM2016-01-03T00:29:19+5:302016-01-03T00:29:19+5:30

दोडामार्गवासीयांची पंधरा वर्षे उपेक्षा : मुलांसह वयोवृद्धांची होतेय कोंडी

When will the dream of the garden be complete? | उद्यानाचे स्वप्न पूर्ण होणार केव्हा?

उद्यानाचे स्वप्न पूर्ण होणार केव्हा?

Next

शिरीष नाईक, कसई दोडामार्ग : तालुक्यातील शाळांतील विद्यार्थी, नवविवाहीत जोडपे, जेष्ठ वयोवृद्ध आजीआजोबा आदींच्या मनोरंजनासाठी सुसज्ज उद्यान आवश्यक आहे. वारंवार मागणी करूनही याकडे प्रशासनाकडून आवश्यक तसा पाठपुरावा करण्यात येत नसल्याने दोडामार्गवासीयांचे बागेचे स्वप्न सत्यात उतरणार तरी कधी? असा प्रश्न पडत आहे.
२६ जून १९९९ रोजी तालुक्याची निर्मिती झाली आणि स्वतंत्र दोडामार्ग तालुका निर्माण झाला. खऱ्या अर्थाने तालुकावासीयांच्या विकासाला सुरूवात झाली. हा तालुका गोवा व कर्नाटक राज्याच्या मधोमध असल्याने दोडामार्ग तालुक्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोडामार्ग निसर्गसंपन्न तालुका असून येथे साधनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे. तालुका परिसरात पर्यटनस्थळेही आहेत. निसर्गरम्य अशा पर्यटनस्थळांमुळे दोडामार्ग तालुक्याची नवीन ओळख निर्माण झाली. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या पुढाकाराने तिलारी आंतरराज्य प्रकल्प उदयास आला आणि तिलारी धरणामुळे त्यात आणखी भर पडली.
येथील तेरवण मेढे, उन्नेयी बंधारा, मांगेली धबधबा, शिवकालीन राजवाडा, इतिहासकालीन गुहा, तालुक्याचे भूषण असलेला कसईनाथ डोंगर, वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली धबधबा, फुकेरी येथील हनुमंतगड, तेरवण मेढे येथील प्रसिद्ध नागनाथ मंदिर, तळकट वनबाग अशी विविध पर्यटनस्थळे तालुक्यात आहेत. मात्र, ही सर्व स्थळे शहरापासून दूर आहेत. गोवा बाजारपेठ जवळ असण्याबरोबरच येथील निसर्गरम्य वातावरणाने तालुका परिसरात नागरीकरणात दिवसेंदिवस वाढ झाली आहे. नवनव्या इमारतीची बांधकामे वाढत असून तालुक्यात सर्व प्रशासकीय कार्यालयांमुळेही येथे दळणवळण वाढले आहे. शिक्षणाच्या सुविधा निर्माण झाल्या. मराठी शाळांबरोबर इंग्रजी शाळाही सुरू झाल्यामुळे एकत्रित तालुक्याची लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे.
दोडामार्ग शहरात सुसज्ज असे सुंदर उद्यान काळाची गरज आहे. पण पंधरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतरही उद्यानाचे येथील रहिवाशांचे स्वप्न स्वप्नच राहीले आहे. दरम्यान, तिलारी धरणाच्या बाजूला ५० लाख रूपये खर्च करून रॉक गार्डन बांधण्यात आले होते. मात्र, या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने रॉक गार्डनचे तीनतेरा वाजले. आजही गार्डन भकास दिसत आहे. दरवर्षी या गार्डनवर खर्च केला जातो. पण ही गार्डन आज अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे तालुकावासीयांना एका सुसज्ज गार्डनला मुकावे लागणार आहे. गार्डनसाठी पैसा आला, मात्र तो कुणाच्या खिशात गेला, हे मात्र समजू शकले नाही. राजकीय पुढाऱ्यांनी पाठपुरावा केला नाही. पाठपुरावा केला असेल, तर हे रॉक गार्डन अखेरची घटका मोजण्याच्या स्थितीत राहिले नसते.
उद्यान झाल्यास वयोवृद्धांना पार्कमध्ये थोडा विरंगुळाही मिळेल. याशिवाय एकत्र आल्यानंतर मनातील ताण-तणाव कमी होतो व पुन्हा नव्याने जीवनाची सुरूवात करण्याची एक नवी उमेद मिळते. त्यामुळे येथे सुसज्ज गार्डन असणे आवश्यक आहे. तशी मागणी दोडामार्ग तालुकावासीय करीत आहेत.
माजी सरपंच असताना येथे गार्डन होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, लोकसंख्येची अट असल्याने निधी मिळू शकला नाही. आता ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्याने निधी उपलब्ध होऊ शकतो. नगरपंचायतीत स्टाफ कमी असल्याने विकासाला गती मिळत नाही. पण उद्यानाचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
- संतोष नानचे,
नगराध्यक्ष, कसई-दोडामार्ग
तालुक्याचा विकास झपाट्याने करण्यात येणार आहे. तालुका ठिकाणी सुसज्ज गार्डन लवकरच बांधण्यात येणार आहे. नगरपंचायतीच्याजवळ खुले क्षेत्र आहे. सर्वांच्या सोयीसाठी अशी जागा निवडून लवकरच बगीचा बांधण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सोयीसुविधा असणार आहेत. केंद्रात व राज्यात भाजपा-सेना सत्ता असल्याने बगीच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो.
- चेतन चव्हाण,
नगरसेवक, कसई-दोडामार्ग
सहकार्याची गरज : सर्वांनाच आनंद मिळेल
कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. त्यामुळे सुसज्ज गार्डन मिळेल, अशी अपेक्षा दोडामार्ग तालुकावासीय करीत आहेत. यासाठी नगरसेवक, राजकीय पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
दोडामार्ग तालुका ठिकाणी सुसज्ज गार्डन (बगीचा) झाल्यास येथील प्रशालेतील विद्यार्थी, लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना, नवविवाहितांना तसेच शिक्षक, शिक्षिका, अधिकारी यांना विरंगुळा मिळणार आहे. मुलांना मनोरंजन मिळणार आहे. पार्कमध्ये लहानमुलांसाठी खेळणी, मनोरंजनाची साधने निर्माण केल्यास मुलांसह सर्वांनाच आनंद देणारा ठरेल.




 

Web Title: When will the dream of the garden be complete?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.