एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला नवीन बसेस कधी मिळणार?, प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 01:50 PM2024-09-18T13:50:15+5:302024-09-18T13:50:44+5:30
सध्या फक्त ३५२ बस उपलब्ध : फेऱ्यांवर परिणाम; किमान ९८ बसची आवश्यकता
कणकवली : राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून सन २०१९-२०च्या सुमारास दररोज २१००च्या जवळपास फेऱ्या सुटायच्या. आता त्यांची संख्या १८००वर आली आहे. मात्र, त्यावेळी सिंधुदुर्ग विभागाकडे उपलब्ध बसेसची संख्या ४५०हून अधिक होती, ती आता ३५२वर आली आहे. अशा स्थितीत सध्या सुरू असलेल्या फेऱ्याही टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अजून किमान ९८ बसची आवश्यकता असून, सिंधुदुर्ग विभागाला या नवीन बसेस कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला सन २०१९-२० पासून फक्त नवीन दहा बसेस मिळाल्या आहेत. त्यावेळी या विभागात कार्यरत बसेसची संख्या ४५०हून अधिक होती. मात्र, टप्प्याटप्प्यात या बसेसचे आयुष्यमान संपत गेले. शासनाकडून नवीन बसेस न आल्याने आयुष्यमान संपलेल्या बसेस भंगारात काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसेसची संख्या घटत गेली. या समस्येकडे शासन तसेच लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
एसटीचा सिंधुदुर्ग विभाग आजही पूर्ण क्षमतेने चालवायचा असेल, तर किमान ४५० सुस्थितीतील बसेसची गरज आहे. परंतु, या विभागाकडे ३५२ बसेस चालू स्थितीत आहेत. पाच वर्षांपूर्वी या विभागाकडून प्रत्येक दिवशी साधारणतः २१००च्या जवळपास बसफेऱ्या सुटत होत्या. त्यातच सुमारे ८० हून अधिक बसेस या कालावधीत भंगारात गेल्या, त्यामुळे या फेऱ्या पुढे कशा सुरू ठेवणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वर्षभरापूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांकडून जाहीर करण्यात आले होते. सिंधुदुर्गमध्ये चार आगारांमध्ये या बसेससाठी चार्जिंग स्टेशनही तयार करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप या इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध झालेल्या नाहीत.
सिंधुदुर्ग विभागाला पुढील महिनाभरात काही बसेस मिळतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. पण मार्च २०२५ पर्यंतचा विचार केला, तर सध्या कार्यरत असलेल्या बसपैकी अजून सुमारे ४० ते ५० बसेस १५ वर्षे पूर्ण झाल्याने भंगारात काढाव्या लागणार आहेत. तोपर्यंत आवश्यक बसेस न आल्यास या विभागातील १८०० फेऱ्यांमध्येही घट होण्याची शक्यता आहे.