क्वॉरी बंद कधी करणार ?
By admin | Published: June 11, 2015 09:36 PM2015-06-11T21:36:33+5:302015-06-12T00:48:33+5:30
विलवडेतील ग्रामस्थांचा आरोप : मालक व नेता, प्रशासनाचे सलोख्याचे संबंध
ओटवणे : तहसीलदार, तलाठी यांनी विलवडे येथील क्रशर क्वॉरीला बंद करण्याचे आदेश देऊनही बंद का केली जात नाही? असा प्रश्न ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. गेली अनेक वर्षांपासून विलवडे येथे पाझर तलाव परिसरात अनधिकृत क्रशर क्वॉरी बिनदिक्कतपणे चालू आहे. या क्वॉरीला ग्रामस्थांकडून प्रचंड विरोध होत आहे. क्वॉरीमुळे पाझर तलावात माती जाऊन तलावात पाणीसाठा कमी होत चालला आहे. याचबरोबर वरचीवाडी येथील घरांनाही तडे गेले आहेत. यामुळे ग्रामस्थांनी तलाठी प्रशांत पास्ते यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला. त्यांनी तत्काळ पंचनामा करून क्वॉरी बंद करण्याचे आदेश दिले. पण या क्वॉरीमध्ये बड्या राजकीय व्यक्तींचा हिस्सा असल्याकारणाने ही क्वॉरी चालूच राहिली. यानंतरही काही महिन्यापूर्वी या क्वॉरीला तहसीलदारांकडून सील ठोकण्यात आले होते. तसेच या क्वॉरीजवळ मिळालेला ५० किलो अमोनियासह जेसीबी आणि हत्यारे जप्त करण्यात आली होती, पण राजकीय हस्तक्षेप व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातमिळवणीमुळे या वस्तू परत करण्यात आल्या. विशेष म्हणजे याचा दंडदेखील भरून घेण्यात आला नाही.
जिल्ह्यादत काही गांवामध्ये उत्खनास बंदी असतानाही, तसेच ग्रामस्थांचा प्रचंड विरोध असतानाही अशा क्वॉरीना कशी काय परवानगी दिली जाते? अशा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत ग्रामस्थ संतप्त असून प्रशासनाविरुद्ध लोकायुक्त कार्यालयात तक्रार देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. (वार्ताहर)
क्वॉरीमुळे घरांची पडझड
गेली दोन वर्ष येथील सामान्य माणसांचा हा लढा सुरू असून क्वॉरीमुळे ग्रामस्थांच्या घरांची पडझड होत आहे. असेच हे सत्र चालू राहिल्यास ऐनवेळी आम्ही कायदा हातात घेऊ, अशी धमकी ग्रामस्थांनी दिली आहे. ओटवणे-विलवडेचे तलाठी प्रशांत पास्ते यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला असून आता तरी शासन अंतिम निर्णय घेतील, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.