पाणी सोडण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार?
By admin | Published: April 9, 2017 11:56 PM2017-04-09T23:56:24+5:302017-04-09T23:56:24+5:30
बांदावासीयांचा सवाल : तिलारी शाखा कालव्यातील काम धिम्या गतीने; पाणी सोडा अन्यथा ‘ते’ काम बंद पाडणार
नीलेश मोरजकर ल्ल बांदा
बांदा-सटमटवाडी येथून जाणाऱ्या तिलारी शाखा कालव्यात कोसळलेली दरडीची माती व दगड काढण्याचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने यावर्षी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी कालवा विभागाला मुहूर्त कधी मिळणार? असा सवाल उपस्थित होत आहे. बांदा येथील संभावित पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कालव्यातून लवकरात लवकर पाणी सोडावे अन्यथा येत्या दोन दिवसांत कालव्यातील काम बंद करण्याचा इशारा बांदा सरपंच बाळा आकेरकर यांनी दिला आहे. कालवा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे स्थानिकांवर मात्र पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे.
दरवर्षी ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच तिलारी शाखा कालव्याच्या दुरुस्तीच्या कामास प्रारंभ करण्यात येत असल्याने कालव्यातून पाणी सोडण्यासाठी चालढकल करण्यात येते. गतवर्षीदेखील डोंगरपाल येथे शाखा कालव्याचे काम करण्यात येत असल्याने एप्रिल अखेरीस पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तिलारी कालवा विभागाचे मुख्य अभियंता सी. अन्सारी यांची मुंबई येथे बैठक घेत तातडीने पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. यावर्षीही तिलारी शाखा कालव्यात सटमटवाडी येथे कोसळलेली माती काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.
मात्र हे काम धिम्या गतीने सुरू असल्याने यावर्षी कालव्यातून पाणी येण्यासाठी बांदावासीयांना अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे. बांदा-सटमटवाडी येथून तिलारीचा उपकालवा जातो. या कालव्याचे काम गेली काही वर्षे धिम्या गतीने होत आहे. उपकालव्याची कामे ही ठेकेदारांसाठी कुरण बनल्याने या कालव्यांची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत.
बांदा परिसरातील कामे ही बोगस असून या कालव्यांच्या कामांचा खर्च हा वाढताच आहे. सटमटवाडी येथील कालव्यालगतचा डोंगरच खाली आल्याने कालव्यासाठी बांधलेली संरक्षक भिंत तसेच पाणी जाण्यासाठी बांधलेली सिमेंटची भुयारे पूर्णपणे गाडली गेली आहेत. तसेच गतवर्षी पावसाळयात टाकण्यात आलेला मातीचा भराव पूर्णपणे वाहून गेला आहे.
२0१२ साली याठिकाणच्या तिलारी उपकालव्यातून पाणी सोडून चाचणी घेण्यात आली होती. मात्र सटमटवाडी येथे निकृष्ट बांधकामामुळे कालवा फुटला होता. निकृष्ट, दर्जाहीन व सुमार बांधकाम ही कालवा फुटण्याची मुख्य कारणे होती. त्यावेळी तिलारी कालवा अधिकाऱ्यांना धारेवर धरत तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी दिरंगाई न करता कामात सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी युध्दपातळीवर कालव्याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र त्यानंतर दरवर्षीच कालव्याची दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. मात्र या कालव्याला पाण्याची प्रतिक्षा ही कायमचीच झाली आहे.
या कालव्यापासून जवळच सर्वात मोठे पूल असून या पुलाला धोका निर्माण झाला आहे. डोंगराचा भाग सरळ रेषेत उभा असल्याने यापुढेही दरड कोसळण्याची शक्यता आहे. याठिकाणी पावसाळ्यात डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने कालव्यातील माती काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तिलारी उपकालव्यांच्या प्रकल्पाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून कालव्यांच्या निकृष्ट कामांमुळे या प्रकल्पाची रक्कमही पाण्यात गेली आहे.
गतवर्षी मार्च महिन्यामध्ये शाखा कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे बांदा शहर व परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे गतवर्षी या परिसराला पाणीटंचाईची झळ बसली नव्हती. यावर्षी बांदा सरपंच बाळा आकेरकर व माजी सरपंच मंदार कल्याणकर यांनी कालव्यातूून पाणी सोडण्याबाबत वेळोवेळी कालवा विभागाकडे पाठपुरावा केला होता. नेतर्डे येथील कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कालवा क्षेत्रातील २६ किलोमीटरपर्यंतच्या गावांना याचा फायदा होणार आहे. हे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांनादेखील होणार आहे.
पावसाळ्यानंतर लागलीच कालवा दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असताना कालवा विभागाने सटमटवाडी येथे उन्हाळ्याच्या तोंडावर दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने कालव्यातून पाणी सोडणे अडचणीचे ठरत आहे. एप्रिल व मे महिन्यात खऱ्या अर्थाने पाण्याची आवश्यकता असते. मात्र याच कालावधीत कालव्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याने यावर्षी पाणीटंचाई जाणवणार आहे.
बांदा परिसरातून जाणाऱ्या शाखा कालव्यात जंगली झाडांची वाढ झाली असून या कालव्याची साफसफाई करणे हे गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे या कालव्याची दुरुस्तीच करण्यात न आल्याने यातील पाणी कचऱ्यामुळे दूषित होण्याची शक्यता आहे. सहा वर्षांपूर्वी मे २0१0 मध्ये पाणी चाचणी घेताना बांदा-सटमटवाडी येथे कालवा फुटण्याचा प्रकार घडला होता.
या चुका टाळण्यासाठी कालवा दुरुस्तीची कामे ही पावसाळयानंतर लागलीच सुरु करणे गरजेचे आहे. मात्र कालवा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे स्थानिकांना पाणीटंचाईशी सामना करावा
लागत आहे.
कालव्यालगतची जमीन ठिसूळ
२0११ साली सटमटवाडी येथील उपकालव्यावर दरड कोसळली होती. त्यानंतर दरड कोसळण्याच्या घटना दरवर्षी पावसाळ्यात होत असताना कालवा विभागाकडून यावर उपाययोजना होताना दिसत नाहीत. मुसळधार पावसामुळे दरड कोसळत असल्याने कालव्याच्या कामाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. कालव्याचे बांधकाम करताना डोंगराला सरळ रेषेत कापण्यात आल्याने मुसळधार पावसात पाणी झिरपल्याने डोंगरातील माती पूर्णपणे कालव्यात कोसळते. कालव्याचे बांधकाम खूप वर्षे सुरू असल्याने कालव्यालगतची जमीन ठिसूळ झाली आहे.
पावसाळयात निकृष्ट बांधकाम केलेला हा कालवा धोकादायक ठरु शकतो. कालव्याच्या कामाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. पावसाळ्यात पाणी कालव्यात मोठ्या प्रमाणात साचते. दरडीमुळे कालवा फुटल्यास याचा धोका लगतच्या शेती बागायतीला बसणार आहे.