प्रत्येक महिन्याला येणारे बांधकाममंत्री आहेत कुठे? :परशुराम उपरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 03:03 PM2019-07-09T15:03:27+5:302019-07-09T15:07:39+5:30
प्रत्येक महिन्याला सिंधुदुर्गात येऊन महामार्गाची पाहणी करणार असे आश्वासन देणारे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील आता आहेत कुठे? असा प्रश्न उपस्थित करतानाच खड्डेमय महामार्गामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जखमी झाले आहेत. मात्र, त्यांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे सवड नाही. पण ज्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेला खड्ड्यांत घातले अशा अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे वेळच वेळ आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.
कणकवली : प्रत्येक महिन्याला सिंधुदुर्गात येऊन महामार्गाची पाहणी करणार असे आश्वासन देणारे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील आता आहेत कुठे? असा प्रश्न उपस्थित करतानाच खड्डेमय महामार्गामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जखमी झाले आहेत. मात्र, त्यांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे सवड नाही. पण ज्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेला खड्ड्यांत घातले अशा अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे वेळच वेळ आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.
येथील मनसे संपर्क कार्यालयात ते बोलत होते. परशुराम उपरकर पुढे म्हणाले, राज्य सरकार सर्वसामान्यांच्या बाजूने असायला हवे. पण हे सरकार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचीच तळी उचलून धरत आहे. कणकवली शहरातील महामार्ग खड्ड्यांच्याप्रश्नी मनसेसह सर्वच पक्षांनी आंदोलने केली. राजकीय पक्ष बाजूला ठेवून कणकवली तालुक्यातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. परंतु याकडे बांधकाममंत्र्यांनी दुर्लक्ष केले आहे. तर मुजोर महामार्ग अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मात्र तत्परता दाखविली जात आहे. याला काय म्हणावे?"
कार्यकर्त्यांना त्रास देण्यापेक्षा खड्डेमुक्तीसाठी वेळ द्या
चिखलफेक आंदोलनामधील आमदार नीतेश राणे आणि स्वाभिमानचे कार्यकर्ते यांची छळवणूक करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर वेगवेगळे फंडे वापरत आहेत. गृहराज्यमंत्री पदाचा अवाजवी वापर करीत आहेत. हाच वेळ त्यांनी महामार्ग दुरुस्ती कामासाठी दिला असता तर जनतेचा त्रास कमी झाला असता असे परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.
किती अधिकारी, ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये गेले?
बैठकांना गैरहजर राहणारे अधिकारी तसेच निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार असे गेली साडे चार वर्षे पालकमंत्री सांगत आहेत. त्यानंतर महामार्गासह प्रमुख जिल्हा मार्गाची दुरवस्था झाली. तर महसूलसह सर्वच खात्यात भ्रष्टाचार वाढला. त्यामुळे आजपर्यंत पालकमंत्र्यांनी किती अधिकारी आणि ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले ते जाहीर करावे अशी मागणी उपरकर यांनी यावेळी केली.