कुठे नेऊन ठेवलीय स्वच्छ रत्नागिरी?
By admin | Published: February 11, 2015 10:45 PM2015-02-11T22:45:04+5:302015-02-12T00:33:07+5:30
रत्नागिरी पालिका : मारुती मंदिर परिसराचीच झाली कचराकुंडी, अस्वच्छतेमुळे दुकानदारही हैराण
रत्नागिरी : ८ फेबु्रवारीपासून सुरू झालेल्या सैनिक भरतीसाठी दरररोज हजारो उमेदवारांचे तांडे शहरात येत आहेत. आयोजकांकडून कोणतेच नियोजन नसल्याने रत्नागिरी शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा, पेपर्स, अपुऱ्या स्वच्छतागृहामुळे जागोजागी केलेली घाण यामुळे मारुती मंदिर परिसराची कचराकुंडी झाली आहे. सैनिक विभाग, जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन न झाल्याने ‘कुठे नेऊन ठेवलीय स्वच्छ रत्नागिरी’, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
आलेल्या व्यक्तिंचा पाहुणचार करणे ही कोकणवासीयांची परंपरा आहे. त्याला अनुसरून रत्नागिरीकर ८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या सैनिक भरतीसाठी रत्नागिरीत येणाऱ्या उमेदवार तरुणांना संपूर्ण सहकार्य देत आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात भरतीसाठी तरुण येणार याची कल्पना आयोजकांना असूनही त्यांच्याकडून येणाऱ्या तरुणांच्या निवासाची, त्यांच्या भोजन-पाण्याची, त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणात स्वच्छतागृहांची सोयच करण्यात आली नाही. त्यामुळे मारुती मंदिर परिसरात कचऱ्याचे, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
दरदिवशी ५ ते १० हजार या प्रमाणात रत्नागिरीत उमेदवार येत असून, दोन दिवसांनंतर होणाऱ्या भरतीसाठीही आधीच तरुण रत्नागिरीत येत आहेत. त्यामुळे दिवसाला १० ते १५ हजार तरुणांना रत्नागिरीतील सुविधांमध्ये सामावणे कठीण बनले आहे. येणाऱ्या तरुणांची निवासाची सोयही नसल्याने त्यांना भर रस्त्यावर, उद्यानांमध्ये वर्तमानपत्रांच्या कागदावर झोपण्याची वेळ आली आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी सैनिक भरती कार्यक्रम होता. त्यामुळे मंगळवारी दुपारपासूनच भरती इच्छुक तरुण रत्नागिरीत दाखल झाले होते. अनेकजण सुमो, जीप वा अन्य खासगी गाड्यांमधून रत्नागिरीत आले होते. त्यांची वाहने कुठे पार्क करावीत, ही समस्याही त्यांच्यापुढे होती. त्यामुुळे मारुती मंदिर परिसर, सावरकर नाट्यगृहाचे आवार, उद्यमनगर, आरोग्य मंदिर, शिवाजीनगर यांसारख्या परिसरात त्यांच्या गाड्या जागा मिळेल तिथे पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)
रत्नागिरीत उमेदवारांचे आदरातिथ्य
भरतीसाठी जिल्ह्याबाहेरून आलेल्या तरुणांचे पाहुणचाराच्या परंपरेला साजेसे स्वागत रत्नागिरीकरांकडून करण्यात आले आहे. सांगलीतील पलूस येथील पंचशील अकॅडमीतर्फे शिवाजी स्टेडियमच्या मागील बाजूला असलेल्या हिंदू कॉलनी परिसरात भरतीसाठी आलेल्या हजारो तरुणांना मोफत जेवण व चहा-नाश्ता दिला जात आहे. त्यामुळे हॉटेल्सवर खाद्यपदार्थ अधिक बनविण्याबाबत आलेला अतिरिक्त ताण आता कमी झाला आहे. तसेच रोजगारासाठी आलेल्या या तरुणांची भोजनाचीही चांगली सोय झाली आहे.
भाट्ये येथे समुुद्र स्नान सुविधा!
सैन्यभरतीसाठी आलेल्या तरुणांना निवासाची व्यवस्था अपुरी आहेच, शिवाय प्रसाधनगृहांची कमतरता आहे. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई आहे. हजारो तरुणांनी आंघोळ तरी करायची कुठे, अशी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर कोणीतरी उतारा दिला तो भाट्ये येथे समुद्रात स्नान करण्याचा. हा उतारा तरुणांनाही भावला असून, गेल्या दोन दिवसांपासून भाट्ये समुद्रावर भरतीसाठी आलेल्या या तरुणांची फौजच समुद्रस्नानाचा आनंद घेताना दिसून येत आहे. मात्र, या समुद्र स्नानाच्यावेळी या तरुणांना काय संरक्षण दिले गेले आहे? भाट्ये येथे पर्यटक बुडाल्याच्या घटना ताज्या असतानाच भरतीसाठी आलेल्या तरुणांची काळजी घेणे आवश्यक असल्याची चर्चा सुरू आहे.
भाजपकडून मोफत खिचडी
शिवसेनेतर्फे नगरसेवक राहुल पंडित यांनी भरतीसाठी आलेल्या तरुणांना कागदपत्रे सत्यप्रत करून देण्यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सोमवारी व मंगळवारी रात्री प्रयत्न केला होता. त्याचे कौतुक झाले होते. त्यानंतर आजपासून (बुधवार) भाजपाच्या रत्नागिरी शहर शाखेतर्फे मारुती मंदिर येथील सर्कलमध्ये मोफत खिचडीची सोय करण्यात आली होती. आज २ हजार विद्यार्थ्यांनी मोफत खिचडीचा लाभ घेतला. १८ फेब्रुुवारीपर्यंत भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना दररोज दुपारी १२ ते २ वाजता या वेळेत मोफत खिचडी देण्यात येणार आहे. या खिचडी वाटपामध्ये नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शहराध्यक्ष संजय पुनसकर तसेच अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.
भरतीनंतर स्वच्छता मोहीम ?
मारुती मंदिर व रत्नागिरी परिसरात या भरतीसाठी आलेल्या तरुणांंमुळे सर्वत्र कागद, कचरा, फळांच्या साली यांमुळे कचराच कचरा झाला आहे. भरतीनंतर शहराच्या स्वच्छतेची पुन्हा एकदा मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. रत्नागिरीकर एवढी चांगली वागणूक देत असताना भरतीसाठी आलेल्या तरुणांकडून मात्र स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. एकाच ठिकाणी कचरा टाकला गेल्यास शहराची स्वच्छता राहील, हे या तरुणांना सांगण्याची वेळ आली आहे. बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी रत्नागिरीत झालेल्या भरतीप्रक्रियेला कोल्हापुरातून तब्बल १२ हजारांपेक्षा अधिक तरुण उपस्थित होते. त्यातील अपात्र तरूणांनी दुपारनंतर परतीचा मार्ग धरला.
वृत्तपत्रांचे झाले अंथरुण
भरतीला आलेल्या तरुणांना रात्री झोपण्यासाठी अंथरुणे नसल्याने अनेकांनी वृत्तपत्रे जमिनीवर अंथरून झोप काढणे पसंत केले आहे. मात्र, जमिनीवर पसरलेले हे कागद न उचलता तेथेच टाकून जात असल्याने जागोजागी कचरा झाला आहे. त्यामुळे अस्वच्छतेत भर पडली आहे. एस्. टी. कॉलनीचे आवार तसेच तेथील फूटपाथवर असंख्य पेपर तसेच पडले होते.
कुंपणांतही अस्वच्छता...
हिंदू कॉलनीत काहींच्या कुंपणात वास्तव्य केलेल्या भरतीस आलेल्या तरुणांनी घाण करून ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून, हे तरुण त्या जागांवरून हटण्यासही तयार नसल्याचे सांगण्यात आले. रत्नागिरी पालिका, सैन्यभरती आयोजक यांनी या तरुणांची योग्य व्यवस्था करावी व नागरिकांना होणाऱ्या त्रासातून सुटका करावी, अशी मागणी होत आहे.