‘ते’ पाच कोटी गेले कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2016 10:39 PM2016-03-16T22:39:53+5:302016-03-16T23:46:44+5:30

युवक काँग्रेसचा सवाल : गाळ उपसण्यासाठी तत्कालिन पालकमंत्र्यांचा निधी

Where did they go? | ‘ते’ पाच कोटी गेले कुठे ?

‘ते’ पाच कोटी गेले कुठे ?

Next

कणकवली : गाळ उपशासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मागील वर्षी मंजूर झाला होता. मात्र, वर्षभरानंतरही या निधीतील कामे झाल्याचे दिसत नाहीत. या निधीतील कामे येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात यावीत, अन्यथा लघुपाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा युवक कॉँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. युवक कॉँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदीप मेस्त्री आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदार समीर घारे यांची बुधवारी यासंदर्भात भेट घेऊन निवेदन दिले.
तालुक्यातील जानवली, कलमठ, वरवडे या गावात दरवर्षी पावसामध्ये पूरस्थिति असते. याची दखल घेत तत्कालिन पालकमंत्री नारायण राणे यांनी उपरोक्त गावातील नदीमध्ये असलेला गाळ उपशासाठी ५ कोटी निधी मंजूर केला होता. सन २०१५ मध्ये फक्त १५ दिवस काम करून पावसाळ्यानंतर उर्वरित काम करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, पावसाळा संपून ५ महिने लोटले तरी गाळ उपशाचे काम सुरु झालेले नाही. जानवली, कलमठ गावातील कलेश्वर नगर, महाजनी नगर, टेंबवाडी, वरवडे फणसनगर येथील २०० पेक्षा जास्त घरे अतिवृष्टीमुळे पाण्याखाली असतात आणि लाखोंचे नुकसान होते. मात्र लघुपाटबंधारे कार्यालयामध्ये संपर्क केला असता सबंधित अधिकारी रत्नागिरी येथे असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून तहसीलदार समीर घारे यांची युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष संदिप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली.
संबंधित अधिकाऱ्यांची आपण एकत्रित बैठक घेऊ, असे आश्वासन तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी समीर घारे यांनी दिले. यावेळी संदिप मेस्त्री, सुनील साळसकर, मंगेश सावंत, कमलेश नरे, महेश आंबेरकर, गौरव यादव, चानी जाधव, अपु देसाई, अविराज मराठे, आशीष सावंत, अभी लाड, भाई कदम, चेतन गवाणकर आदी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

आंदोलनाचा इशारा
गाळ उपशाचे काम सुरू करताना तीन गावातील सरपंचांना कळवले होते का? गेल्या वर्षी झालेल्या कामाचे मूल्यांकन किती? काढलेला गाळ लिलाव पद्धतीने देणे बंधनकारक असताना लिलाव का झाला नाही? असे प्रश्न यावेळी उपस्थित केले. गाळ उपशाचे काम ८ दिवसात सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि लघुपाटबंधारेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.

Web Title: Where did they go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.