...तर लंका अयोध्येच्या राज्यात असती
By admin | Published: February 8, 2016 10:26 PM2016-02-08T22:26:27+5:302016-02-08T23:47:53+5:30
चारूदत्त आफळे : चिपळूण येथील कीर्तनमालेला अखेरच्या दिवशी गर्दी
चिपळूण : बळीराजाने साम्राज्य वाढवण्याच्या ईर्ष्येने इतर देशातील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. दुसऱ्याला त्रास देऊन साम्राज्य वाढवणे ही आसुरी प्रवृत्ती. इंग्रज, ख्रिश्चन, मुसलमान यांनीही साम्राज्य वाढीसाठीच प्रयत्न केले. पण हिंदूनी तसे कधीच केले नाही. जो दैवी गुणांनी युक्त असतो, तो असे वर्तन कधीच करत नाही. अन्यथा रावणाच्या वधानंतर प्रभू रामचंद्राने लंकेचे राज्य अयोध्येच्या राज्यात जोडले असते, असे प्रतिपादन चारुदत्त आफळे यांनी कीर्तन महोत्सवात केले.
अण्णासाहेब खेडेकर संकुलामध्ये श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. शेवटच्या दिवशी वामनावतार व परशुरामावतार या विषयावर आफळेबुवा बोलत होते. प्रल्हादाचा नातू, विरांचनाचा मुलगा असलेला बळी हा असूर कुळात जन्मलेला. नृसिंहावतारात प्रल्हादाला भगवंतानी वर दिला होता की, तुझ्या कुळात कोणालाही मारणार नाही. त्यामुळे भगवंत वामनावतार घेऊन बळीच्या द्वारी गेले. त्यावेळी बळीराजाकडे यज्ञ चालला होता. भगवंतानी बळीकडे तीन पावले जमीन मागितली. वास्तविक वामनरुपातील भगवंताला बळीने ओळख
ले होते. दान देण्याचा शब्द दिला होता. याला कुलगुरु शुक्राचार्यांचा विरोध होता. पण तरीही बळीने दान दिले.
बळीच्या भक्तीला प्रसन्न झालेल्या भगवंताने बळीला पाताळात सुतण लोकांत पाठवले व पुढील मन्वंतरात इंद्र करण्याचे आश्वासन दिले. आसुरी गुण कमी होऊन दैवी गुणांची वाढ होईपर्यंत सुतण लोकी ठेवले. परशुरामावतार हे आजच्या कीर्तनाचे प्रमुख आकर्षण होते. कारण अगदी अलिकडे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने परशुरामाविषयी निर्माण झालेले वाद सर्वश्रुत होते. ज्याने ही भूमी निर्माण केली, असे ते म्हणाले.
परशुराम हा क्षत्रियांचा वैरी असा समज पसरवला जातो. पण सहस्त्रार्जुनाने जर जमदग्नींची कामधेनू पळवली नसती तर? सहस्त्रार्जुनाने जमदग्नींचा वध केला म्हणून परशुरामाने त्याचा व त्याला पाठिंबा देणाऱ्या २१ क्षत्रिय कुळांचा विनाश केला, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)