घरात भांडणे असताना विकासाच्या बाता अशोभनीय

By admin | Published: October 13, 2015 09:06 PM2015-10-13T21:06:11+5:302015-10-14T00:01:26+5:30

नीतेश राणेंचे सेना-भाजपवर टिकास्त्र : दोडामार्गात आघाडीच्या प्रचार कार्यालयाचा प्रारंभ

While the quarrel in the house, the point of development is inauspicious | घरात भांडणे असताना विकासाच्या बाता अशोभनीय

घरात भांडणे असताना विकासाच्या बाता अशोभनीय

Next

दोडामार्ग : केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने विकासनिधी आणण्यासाठी मते द्या, असे सांगणाऱ्या सेना-भाजपचे राज्यासह जिल्ह्यात जोरदार भांडण सुरू आहे. ही भांडणे चालू असताना दोडामार्गच्या विकासाची जबाबदारी स्वीकारण्यास सेना-भाजप एकमेकाच्या उरी पडत आहेत. ही खेळी अशोभनीय आहे. मात्र, स्वत:चे घर सांभाळू शकत नाही ते मतदारांना काय न्याय देणार, असा सवाल उपस्थित करीत आमदार नीतेश राणे यांनी सेना-भाजपवर टीकास्त्र सोडले. कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळीराष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी, काँग्रेसचे प्रचारप्रमुख संजू परब, तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार नीतेश राणे म्हणाले, कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत महत्वाची असून याठिकाणी प्रत्येक प्रभागात मतदार संख्या कमी आहे. यामुळे प्रत्येक मताला महत्त्व आहे. जेवढी ही निवडणूक सोपी वाटते तेवढी सोपी नसून दिवसा कमी आणि रात्री जास्त प्रमाणात निवडणुकीत काम चालणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता बाळगली पाहिजे. विरोधकांचे मुद्दे कोणते आहेत आणि ते कसे चुकीचे आहेत, यासाठी मतदारांत प्रबोधन करून त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे.
आज विरोधक असलेले सेना-भाजपवाले प्रचार करताना केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे, असे सांगून मते मागत आहेत. हाच त्यांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. परंतु सत्तेच्या गोष्टी जे सांगत आहेत त्यांची भांडणे आज चव्हाट्यावर आली आहेत.
सेना-भाजपची युती कोणत्याही क्षणी तुटू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली असून कल्याण-डोंबिवलीत ही युती तुटली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर कालच टीका केली. तर आज खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. त्यामुळे अल्पावधीतच ही भांडणे मोठी होणार आहेत. आपला संसार धड नसताना जनतेला भुलवून त्यांचा खोटा विकास करू पाहणाऱ्यांचे मनसुबे जनतेला दाखवून द्या, असे आवाहनही राणे यांनी केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री अकार्यक्षम असल्याने ते नकोत यासाठीच जुने शिवसैनिक प्रयत्न करत आहेत. ही इथली खरी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्यांना आपले घर सांभाळता येत नाही ते जनतेचा विकास कसा करणार हे ओळखणे गरजेचे आहे, अशी टीका आमदार नीतेश राणेंनी केली.
या निवडणुकीत प्रत्येक प्रभागाची प्रत्येक पदाधिकाऱ्यावर जबाबदारी दिली जाणार असून तशी यंत्रणा राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आपला प्रभाग हेच आपले आयुष्य आहे, असे समजून काम करा, असे आवाहनही राणेंनी कार्यकर्त्यांना केले. (प्रतिनिधी)

गद्दारी खपवून घेणार नाही
कोणत्याही परिस्थितीत गद्दारी खपवून घेतली जाणार नाही.
जे गद्दारी करतील त्यांचा योग्य समाचार घेतला जाईल, अशी रोखठोक सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना देत याठिकाणी कोणी मी नसून आम्ही आहोत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
चांगले काम करा आपला मोठा विजय होईल, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वासीत केले.

Web Title: While the quarrel in the house, the point of development is inauspicious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.