तलाठ्याला लाच घेताना रंगेहात अटक
By admin | Published: February 5, 2016 12:54 AM2016-02-05T00:54:04+5:302016-02-05T00:54:04+5:30
चार हजारांची लाच : संगमेश्वर तालुक्यातील प्रकार
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फ देवरुख येथील तलाठ्याला ७/१२ वर नोंद घालण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी ही कारवाई केली. सुरेश आत्माराम जाधव (वय ४१) असे या तलाठ्याचे नाव आहे.
सतीश सदाशिव जाधव (माळवाशी) यांनी वारस तपास करून घेतला होता. त्यांना त्यांच्या मयत आत्याचे वारस म्हणून असलेले नाव कमी करायचे होते. त्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांनी तीन-चार फेऱ्या मारल्या. मात्र, तलाठी सुरेश जाधव यांच्याकडून त्यांना उडवाउडवीची
उत्तरे देण्यात आली. याचदरम्यान जाधव यांनी त्यांच्याकडे नाव कमी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाच घेऊन काम करण्याचे मान्य केल्याने तक्रारदार सतीश जाधव यांनी याबाबत रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. या विभागाने गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास सापळा रचून सुरेश जाधव याला रंगेहात पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश गुरव, पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनावणे, दीपक बर्गे, सहायक पोलीस फौजदार जाधवर, हेड कॉन्स्टेबल कदम, हरचकर, पोलीस नाईक सुतार, पोलीस नाईक भागवत यांनी केली. संगमेश्वर तालुक्यातील गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी कारवाई आहे.