पांढरपिसेने डोक्यात काठी तर पाटीलने हाताने मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 04:47 PM2020-02-12T16:47:18+5:302020-02-12T16:50:55+5:30
पण डोक्यावर मोठ्या वस्तूने प्रहार केल्यानेच डोक्याच्या आतील बाजूला जखम झाल्याचे पुढे आले आहे. तसेच गावकर याच्या अंगावर हाताने ठोसे मारल्याचेही पुढे आले आहे. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता राजेश गावकर याच्या डोक्यात जी काठी मारली ती सुभेदार झिलबा पांढरपिसे याने मारली तर हाताने मारहाण अधीक्षक योगेश पाटील याने केल्याचे पुढे आले आहे.
सावंतवाडी : येथील कारागृहातील वॉरंटवरील संशयित आरोपी राजेश गावकर याचा मृत्यू हा कारागृह अधीक्षक व त्याच्या सहकाºयांच्या मारहाणीतच झाला आहे. मात्र, ही मारहाण नेमकी कशी झाली याचा उलगडा झाला असून, यात कारागृह अधीक्षक योगेश पाटील याने हाताच्या ठोशांनी तर सुभेदार झिलबा पांढरपिसे याने डोक्यावर काठी मारल्याचे पुढे आले आहे. या दोघा आरोपींच्या शोधासाठी लवकरच पोलीस पथक पुणे येथे रवाना होणार असून, कारागृह महानिरीक्षकांनाही पोलीस आपला अहवाल लवकरच सादर करणार आहेत.
येथील कारागृहात देवगड येथील दारुच्या गुन्ह्यात अटक वॉरंट बजावलेला संशयित आरोपी राजेश गावकर हा १७ डिसेंबर रोजी सायंकाळी येथील कारागृहात दाखल झाला होता. मात्र, अवघ्या दोन दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. यामुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उभे राहिले होते. कारागृह प्रशासनाच्या कारभारावर सर्व बाजूंनी ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे कारागृह विभागाने आपल्यापरीने या प्रकरणाची चौकशी केली. तसेच पोलिसांनीही राजेश गावकर याच्या मृत्युप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली होती.
राजेश गावकर याच्या मृत्युनंतर शवविच्छेदन कोल्हापूर येथे करण्यात आले. त्यावेळी त्याच्या अंगावर १७ जखमा होत्या. यातील अनेक जखमा या कारागृहात दाखल झाल्यानंतरच्या होत्या. त्यामुळे प्राथमिक अहवाल येथील पोलिसांना मिळाल्यानंतर आणखी सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी कोल्हापूर येथील वैद्यकीय पथक कारागृहात दाखल झाले. त्यांनी कारागृहाची तपासणी केली. यावेळी या पथकाने गावकर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची पाहणी केली. गावकर पडल्यानंतर त्याच्या डोक्याला जखम होऊ शकते का हेही तपासले. पण त्यांना तसे काही आढळले नाही.
पण डोक्यावर मोठ्या वस्तूने प्रहार केल्यानेच डोक्याच्या आतील बाजूला जखम झाल्याचे पुढे आले आहे. तसेच गावकर याच्या अंगावर हाताने ठोसे मारल्याचेही पुढे आले आहे. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता राजेश गावकर याच्या डोक्यात जी काठी मारली ती सुभेदार झिलबा पांढरपिसे याने मारली तर हाताने मारहाण अधीक्षक योगेश पाटील याने केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, ही अचानक मारहाण करण्यामागचे कारण मात्र गुलदस्त्यात असून, आरोपी मिळाल्यानंतरच या कारणाचा उलगडा होऊ शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पोलिसांनी कारागृह अधीक्षक पाटील व सुभेदार पांढरपिसे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा अहवाल कारागृह विभागाला पाठविण्याचे काम सुरू केले असून, आरोपींची प्राथमिक माहिती घेण्याचे कामही सुरू केले आहे. योगेश पाटील हा पुणे येथे ट्रेनिंग सेंटरमध्ये असल्याने लवकरच त्याच्या मागावर पोलीस पाठविण्यात येणार आहेत. तर पांढरपिसे हा वैद्यकीय सुट्टी टाकून कारागृहातून गेला आहे. त्याचीही माहिती पोलीस घेत आहेत.
अधीक्षकांची जंत्रीच पोलिसांच्या हाती
कारागृह अधीक्षकांचे कारनामे मोठे असून, एकामागे एक अशी जंत्रीच पोलिसांच्या हाती लागत आहेत. ही जंत्री बघून पोलीसही चांगलेच चक्रावून गेले आहेत. मात्र, पोलिसांनी यातील माहितीची सत्यता आरोपी मिळाल्याशिवाय करू शकणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.