बेशिस्त वाहतुकीला लगाम कोणाचा ?
By admin | Published: July 7, 2017 12:50 AM2017-07-07T00:50:17+5:302017-07-07T00:50:17+5:30
बेशिस्त वाहतुकीला लगाम कोणाचा ?
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करू पाहणाऱ्या रत्नागिरी शहरात अपघात होणे, ही बाब आता नित्याची झाली आहे. कोणीही यावे व बेदरकारपणे अपघात करून जावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नियम पाळून वाहने चालवणाऱ्यांचे जीव या बेदरकार वाहनचालकांसाठी जणू स्वस्त झालेत की काय, सामान्य वाहनचालकांच्या जीवाशी बेशिस्त वाहनचालक किती काळ हा खेळ खेळणार आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांमध्ये उमटत आहे. या बेशिस्त व बेदरकार वाहतुकीला लगाम घालणार कोण, असा संतप्त सवालही केला जात आहे.
रत्नागिरी शहरातील रस्त्यांना न पेलवण्याइतकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहतूक नियमनासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस खाते व रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त समितीचे गठन करून शहरात वाहतुकीला शिस्त लावण्याचा चांगला प्रयत्नही झाला. गेल्या दोन वर्षांपासून शहरात राबविण्यात येत असलेल्या वाहतूक नियमन व्यवस्थेचा परिणाम सुरूवातीच्या काळात चांगला दिसून आला. मात्र, नंतर त्यामध्ये शिथिलता आली. भरधाव वेगाने वाहने हाकणाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्याने दररोज भर गर्दीच्या वेळी ‘पळा पळा कोण पुढे पळेतो...’ अशी अतिवेगाने वाहनांची स्पर्धाच होत असल्याचे दिसून येत आहे. या वेगवान वाहने हाकणाऱ्यांना आवरले नाही तर यापुढेही नियम पाळणाऱ्यांना मुठीत जीव घेऊनच वाहने चालवावी लागणार आहेत.
शहरात वाढत असलेल्या वाहतुकीतील बेशिस्तीमुळे नियम पाळून वाहने चालवायची की नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य वाहनचालकांना पडला आहे. रस्त्यांवरून दाटीवाटीने जाणाऱ्या वाहनांच्या मधील गॅप शोधत आपण आॅलिम्पिकमध्ये उतरल्याच्या तोऱ्यात वाहने चालविण्याचे प्रकार सतत होत आहेत. बेशिस्तीचा हा तोरा खरोखरच उतरवण्याची यंत्रणा शहरात आहे काय, असा प्रश्नही विचारला जात आहे.
रत्नागिरी शहरात बेदरकारपणे, बेशिस्तपणे, अतिवेगाने वाहने हाकणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, एखादे वाहन अतिवेगाने शहरात येत आहे किवा जात आहे, त्याद्वारे अपघात होत आहेत, ब्रेक फेल झाल्याने वाहन अतिवेगात आहे, कोणाला तरी डॅश केल्याने त्या वाहनाचा पाठलाग होत असल्याने गाडी अतिवेगाने पळवली जात आहे, असे घडत असताना त्याचा संदेश पोलिसांपर्यंत वेळेत पोहोचतो का, यासारखे प्रश्नही निर्माण झाले आहेत. शहरातील वाहने लक्षात घेता वाहतूक शाखेतील कर्मचारी वाढणेही गरजेचे असल्याचा मुद्दा पुढे येत आहे.
वाहतूक विभाग अलर्ट : तीन महिन्यात दोन लाख रूपयांचा दंड
रत्नागिरीतील वाहतूक व्यवस्थेबाबत बोलताना वाहतूक पोलीस निरीक्षक अयुब खान म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात रत्नागिरी शहरात अतिवेगाने वाहने हाकणाऱ्या १५९ वाहनचालकांना १ लाख ९७ हजार रुपये दंड करण्यात आला. या सर्वांचे वाहन परवाने निलंबित करावेत, असा प्रस्तावही प्रादेशिक परिवहन विभागाला नुकताच पाठविण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडे ४ वॉकीटॉकी असून, बंदोबस्त व महत्त्वाच्या वेळी त्याचा वापर होतो. अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांचे नंबर पुढील नाक्यावरील पोलिसांना तत्काळ दिले जातात, असेही खान यांनी सांगितले.