Shivaji Maharaj Statue Collapse: नेमका हलगर्जीपणा कोणाकडून झाला?, शिल्पातल्या त्रुटी जनतेला दिसल्या मात्र..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 06:32 PM2024-08-28T18:32:09+5:302024-08-28T18:32:38+5:30
शिवप्रेमींच्या संतप्त प्रतिक्रिया : सरकारने हात झटकून कसे चालेल ?
संदीप बोडवे
मालवण : देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते जेव्हा देशाच्या आराध्याचे शिल्प भव्य पुतळ्याच्या स्वरूपात उभारले जाते, तेव्हा या कामाच्या प्रक्रियेत झालेला हलगर्जीपणा कदापिही खपवून न घेण्यासारखाच असतो. शिवपुतळा उभारणाऱ्या शिल्पकार आणि रचना सल्लागाराला दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून सरकारने आपले हात झटकले आहेत; परंतु हा पुतळा उभारताना भारतीय नौदलाचा पुढाकार होता. केंद्र सरकारचे या कामावर लक्ष होते, तर महाराष्ट्र सरकारचा याकामी प्रत्यक्ष सहभाग असताना या प्रकरणात नेमका हलगर्जीपणा कोणाकडून झाला? हे तपासणेही तितकेच आवश्यक आहे.
या संदर्भात तमाम शिवप्रेमींकडून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले असून संबंधितांना याचे उत्तर द्यावेच लागणार आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवणजवळील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीतच कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राज्यच नव्हे, तर देशभरातील शिवप्रेमींमधून संतापाची लाट उसळली आहे.
शिल्पातल्या त्रुटी जनतेला दिसल्या मात्र..
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारण्यात आल्यानंतर अनेकांनी या पुतळ्याच्या कामाबाबत आक्षेप घेतले होते. मालवणातील स्थानिक शिवप्रेमी व काही इतिहास अभ्यासकांनी अनेक त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शिवपुतळ्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जनतेला या कामातील त्रुटी दिसत होत्या. मात्र, सरकारला यात राजकारण दिसले होते आणि यातूनच या सगळ्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आल्याचा आरोप आता होत आहे.
पुतळा उभारतानाची घाई नडली?
राजकोट येथील पुतळा उभारण्यासाठी साधारण तीन वर्षांचा कालावधी आवश्यक असताना फक्त सात महिन्यांच्या कालावधीत या पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात आले. यासाठी जून २०२३च्या मध्यात नौदलाकडून तुलनेत मोठ्या शिल्पकलेचा कामी अनुभव असलेल्या जयदीप आपटे यांना विचारणा करण्यात आली. आपटे यांनी चालून आलेली संधी सोडायची नाही, असे ठरवून पुतळ्याच्या कामाला हात घातला. अल्पावधीत काम पूर्ण करण्यासाठी थ्रीडी डायमेन्शनल प्रिंटिंगचा आधार घेण्यात आला. मित्रांच्या मदतीने एका रात्रीत १८ नवीन प्रिंटर उभे करण्यात आले. तयार झालेले कास्टिंगचे तुकडे स्टुडिओमध्येच जोडून मग जागेवर पुतळा उभा केला जातो. मात्र, पुतळा उभारण्यात येणाऱ्या जागेकडे जाणारे रस्ते अरुंद असल्याकारणाने कास्टिंगचे तुकडे जागेवर नेऊन जोडण्यात आले.
पुतळ्याच्या गुणवत्तेची चाचपणी आवश्यक नव्हती ?
अत्यंत मर्यादित कालावधीत शिवरायांचा पुतळा बनविण्यास देण्यात आला होता, तेव्हाच खरंतर या पुतळ्याच्या दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड झाली होती. एखाद्या आदर्शाचे जेव्हा सार्वजनिक स्वरूपाचे शिल्पकृती पुतळा उभारण्याचे काम हाती घेतले जाते, तेव्हा अशा कामांवर सांस्कृतिक खात्याच्या कला संचालनालयाकडून निर्धारित करण्यात आलेल्या समितीचे नियंत्रण असते. या समितीने ठरवून दिलेल्या मानकांनुसार पुतळा बनविला जाणे आवश्यक असते. उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसल्याबाबतची तपासणी झाल्यानंतरच राजकोट येथील पुतळा उभारण्यास परवानगी मिळणे आवश्यक होते. जर या पुतळ्याच्या गुणवत्तेची योग्य प्रकारे चाचपणी झाली असती तर अल्पावधीतच दुर्दैवी घटना घडली नसती.
भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास झाला नाही
राजकोट येथे समुद्रकिनारी शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला त्या ठिकाणी पावसाळी कालावधीत वाऱ्याचा वेग प्रचंड असतो. पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे साहित्य वापरले गेले तेव्हा खारे पाणी आणि वेगाच्या वाऱ्यांचा मारा विचारात घेणे आवश्यक होते. या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, पुतळा उभारताना अभ्यासली होती का? त्याबाबत सक्षम यंत्रणेकडून अहवाल घेण्यात आला होता का? तसे न झाल्यास याला दोषी कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.