‘सुरक्षा रक्षक’ जबाबदारी कोणाची?

By Admin | Published: December 11, 2014 11:12 PM2014-12-11T23:12:09+5:302014-12-11T23:41:58+5:30

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : नोकरीसाठी गेले चार दिवस उपोषण सुरू

Who is the 'security guard'? | ‘सुरक्षा रक्षक’ जबाबदारी कोणाची?

‘सुरक्षा रक्षक’ जबाबदारी कोणाची?

googlenewsNext

रजनीकांत कदम - कुडाळ -गेली अनेक वर्षे एमआयडीसीमध्ये सेवा बजावूनही नोकरी नोंदणीकृत नसल्याच्या कारणास्तव नाकारल्याने एमआयडीसीच्या स्थानिक सुरक्षा रक्षकांनी गेले चार दिवस आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या अवस्थेला एमआयडीसी प्रशासन की सुरक्षा रक्षक बोर्ड जबाबदार आहे, हा प्रश्न आहे. या परिस्थितीमुळे जुने सुरक्षा रक्षक व नवीन सुरक्षा रक्षक यांच्यात वाद निर्माण झाले आहेत.
कुडाळ एमआयडीसी ही प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे प्रश्न, समस्या, आजारी उद्योग यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली. यावेळी एमआयडीसी सुरक्षा रक्षकांच्या नोकरीवरुन मोठा वाद निर्माण झाला असून गेली दहा ते बारा वर्षे याठिकाणी सेवा बजावलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांना एमआयडीसीच्या सुरक्षा रक्षक बोर्डाने केवळ नोंदणीकृत नसल्याने नोकरीवरुन कमी करत त्या ठिकाणी नवीन सुरक्षा रक्षकांची भरती केली आहे.
गेली दहा बारा वर्षे केलेली सेवा, वाढते वय, कुटुंबाचा उदरनिर्वाह, त्यासाठी काढलेले कर्ज, तुटपुंज्या पगारात चालविण्यात येणारे घर, आजारपण, मुलांचे शिक्षण याची व्यवस्था करत असताना या सुरक्षा रक्षकांना मोठी कसरत करावी लागत असतानाच अचानकपणे नोकरीवरुन कमी व्हावे लागत असल्याने सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबावर मोठे आभाळच कोसळले आहे.
कुडाळ एमआयडीसी येथे या अगोदर सुरक्षा रक्षक एजन्सीच्यावतीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती गेली अनेक वर्षे करण्यात आली होती. आता एमआयडीसी प्रशासनाच्या नवीन ध्येयधोरणांनुसार या ठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आली. परंतु या भरतीमुळे अगोदर कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना मात्र नोकरी गमवावी लागली. गेली अनेक वर्षे येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी केलेल्या व आता नोंदणीकृत नसल्यामुळे नोकरी गमावण्याची वेळ आलेल्या या २० सुरक्षा रक्षकांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाह कसा चालवायचा, अशी समस्या उभी आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांनी आमची सुरक्षा रक्षक म्हणून नोंदणी करून घेऊन आम्हाला सेवेत घ्यावे, अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही, असे म्हणत सोमवारी सकाळपासून कुडाळ एमआयडीसी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. इतके वर्ष सेवा करुन आम्हालाच डावलण्यात आले. काहीजणांचे शासकीय नोकरीसाठी लागणारे वयही निघून गेल्यामुळे दुसरीकडे नोकरी मिळण्याचीही खात्री नाही.

लेखी मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार
इतकी वर्षे आम्ही येथे सेवा बजावून आमच्यावर ही पाळी येत आहे. आम्ही आता मागे हटणार नाही. जोपर्यंत आम्हाला एमआयडीसी प्रशासन नोकरीसंदर्भात लेखीपत्र देत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आमरण उपोषण मागे घेणार नाही. येथील एमआयडीसी प्रशासनाच्या काहीशा चुकीमुळे भरतीसंदर्भात निर्माण झालेल्या वादामुळे आता या ठिकाणच्या स्थानिक सुरक्षारक्षकांना मात्र, उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.
- उपोषणकर्ते,
एमआयडीसी, कामगार कुडाळ

नेमकी चूक कोणाची?
गेली दहा ते बारा वर्षे सेवा बजावलेल्या या स्थानिक सुरक्षा रक्षकांची केलेली भरतीही बेकायदेशीर आहे. कारण भरती करणाऱ्या सुरक्षारक्षक मंडळे बोर्डाची निर्मिती ३0 जुलै २0१४ रोजी झाली आहे.
या मंडळाने नोंदणी शासन निर्णय २ मार्च २00९ नुसार केली पाहिजे होती. तसेच २५ आॅगस्ट २0१0 नुसार सध्या कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना सामावून घेतले पाहिजे. असे असताना मंडळाने एमआयडीसी १ एप्रिल २0१४ चे मागणी पत्र जे कोल्हापूर मंडळाला दिले होते. ते ग्राह्य मानने चुकीचे आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे रत्नागिरीतील तेरा सुरक्षारक्षक भरलेत. मात्र, सिंधुदुर्गमधील नाहीत.


या सुरक्षा रक्षकांची भरती का नाही?
दहा ते बारा वर्षे सेवा केलेल्या सुरक्षा रक्षकांची भरती का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हे सुरक्षा रक्षक विद्यांचल सुरक्षा रक्षक एजन्सीच्यावतीने याठिकाणी काम करत होते.
यांची सुरक्षा रक्षक म्हणून एमआयडीसीकडे नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र, ही नोंदणीकृत नसल्याने त्यांची या नोकरीत भरती होऊ शकली नाही, असे कारण एमआयडीसी प्रशासन देते. मात्र, याबाबत वस्तुस्थितीची माहिती घेणे आवश्यक आहे.
ज्या एमआयडीसीमध्ये सुरक्षा रक्षक सेवा बजावत आहेत, त्यांनीच नोंदणीसाठी आपली नावे सुरक्षा रक्षक बोर्डाकडे पाठविण्याची गरज असते.
कुडाळ एमआयडीसीचे अधिकारी आम्ही सुरक्षा रक्षक मंडळ बोर्डाकडे नोंदणी केल्याचे सांगत आहेत. मग या भरतीत या सुरक्षा रक्षकांना न घेता नवीन सुरक्षा रक्षकांची कशी भरती केली ? रत्नागिरी एमआयडीसीने सुरक्षा रक्षकांची नोंदणी बोर्डाकडे वेळीच केल्यामुळे तेथे हा प्रश्न नाही.
 

Web Title: Who is the 'security guard'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.