मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने कोणाला पडत होती?
By admin | Published: June 10, 2016 11:42 PM2016-06-10T23:42:18+5:302016-06-11T00:30:11+5:30
वैभव नाईक यांचा प्रतिटोला : रेडी बंदराबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
कणकवली : पालकमंत्रीपदासाठी आम्ही नारायण राणे यांचा वापर करतो, अशी टीका करणाऱ्या आमदार नीतेश राणे यांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने कोणाला पडत होती आणि आज त्यांची काय अवस्था आहे, याचा विचार करावा, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यांचा त्यांनी येथील विजय भवनात आयोजित पत्रकार परिषदेत समाचार घेतला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, अॅड.हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते.
वैभव नाईक म्हणाले की, आठ वर्षांपूर्वी शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही अशी वल्गना नारायण राणेंनी केली होती. मात्र, मी जिल्हाप्रमुख असताना शिवसैनिकांनी दोन आमदार आणि एक खासदार निवडून आणला. नीतेश राणे जिल्ह्यात कॉँग्रेसचे नेतृत्व करायला लागल्यानंतर कॉँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे.
रेडी बंदराच्या माध्यमातून विकासकाने शासनाची लूट केली आहे. त्यामुळे रेडी बंदर विकासाकडून काढून घ्यावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. सन २००९ सालापासून आतापर्यंत १ कोटी १ लाख ३५ हजार ५३० टन एवढे खनिज रेडी बंदरातून निर्यात झाले आहे. यासाठी हाताळणी शुल्क म्हणून प्रतिटन २५० रूपये कंपनीकडून घेण्यात आले. आतापर्यंत रेडी बंदर विकासकाने खर्च वजा जाता सुमारे १८० कोटी रूपयांचा नफा मिळवला. याबाबत तक्रारीनंतर बंदर विकासकाने न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घातल्याचे नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गडकरींच्या मदतीने जास्तीत जास्त मोबदला देणार
नारायण राणे यांच्याशिवाय आपली ओळख काय आहे, हे आमदार नीतेश राणे यांनी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनाच विचारून घ्यावे. महामार्गासाठी २० पट मोबदला मिळालाच पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या नीतेश राणे यांनी जमिन मोजणी होऊ देणार नाही, असा पवित्राही घेतला होता. मात्र, जमिन मोजणी पूर्णही झाली आहे आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागे खासदार विनायक राऊत उभे असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीने जास्तीत जास्त मोबदला दिला जाणार आहे.
- वैभव नाईक, आमदार, शिवसेना