कोण ठरणार ‘लिटील व्हाईस’चा मानकरी
By admin | Published: January 7, 2016 12:01 AM2016-01-07T00:01:46+5:302016-01-07T00:46:21+5:30
आज रंगणार स्पर्धा : रत्नागिरीतील १३ बालगायकांमध्ये सूरमयी चुरस
रत्नागिरी : ‘लिटील व्हाईस आॅफ रत्नागिरी’ यावर्षी कोण ठरणार, याबाबत उत्सुकता ताणली आहे. यावर्षीही संगीत क्षेत्रातील दिग्गज स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभले आहेत. ‘झी-सारेगमप’च्या सर्व पर्वांचे संगीत संयोजक कमलेश भडकमकर, प्रसिद्ध गायक मनोज देसाई, मेघना देसाई या संगीततज्ज्ञ परीक्षकांसह, ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील अभिनेत्री तसेच गायिका स्वरांगी मराठे सेलिब्रेटी म्हणून स्पर्धेला लाभणार आहेत.
ही स्पर्धा रत्नागिरीतील एक ग्लॅमरस स्पर्धा ठरली आहे. स्पर्धेतील अंतिम १३ बालगायकांचे खास फोटो शूट, तसेच व्हिडिओ शूट करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या गाण्यांची उत्तम तयारी करून घेण्यात येत आहे. हा एक वेगळा अनुभव असल्याचे हे ‘लिटील व्हाईस’ सांगत आहेत. तसेच ते रत्नागिरीत बॅनरद्वारे झळकणार आहेत. स्पर्धेसह बहारदार गीतांची एक सुरेल संगीत मेजवानी असा या स्पर्धेचा बाज आयोजक ‘मँगो इव्हेंट’ आणि ‘दिल से क्रीएशन्स’तर्फे आखण्यात आला आहे.
यावेळी स्पर्धेचा विस्तार जिल्हास्तरावर करण्यात आला. त्यानुसार रत्नागिरीसह चिपळूण केंद्रावर आणखी एक प्राथमिक फेरी घेण्यात आली. यावळेचे १३ ही ‘लिटील व्हाईस’ दमदार आहेत. त्यामुळे स्पर्धा रंगतदार होणार असल्याचा विश्वास आयोजक ‘मँगो इव्हेंट’चे अभिजित गोडबोले यांनी व्यक्त केला आहे.
गुरूवार, दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ही स्पर्धा रंगणार आहे. राज्याच्या संगीत क्षेत्रातील कमलेश भडकमकर, मनोज देसाई यांसारखे दिग्गज संगीततज्ज्ञ या स्पर्धेला परीक्षक लाभणार आहेत, हे या स्पर्धेचे विशेष वेगळेपण आहे. त्यामुळे या स्पर्धेला रत्नागिरीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)
कमलेश भडकमकर, गायक मनोज देसाई यांची उपस्थिती.
‘बाजीराव मस्तानी’फेम स्वरांगी मराठे सेलिब्रिटी.
दिग्गज परीक्षकांची उपस्थिती.
रत्नागिरीत रंगणारी ही स्पर्धा सुरूवातीला तालुक्यापुरतीच मर्यादित होती. मात्र, या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त झाल्यानंतर स्पर्धेचा आवाका वाढविण्यात आला. स्पर्धेत जिल्ह्यातील नवोदित कलाकारांना संधी देण्यात येत असून, त्यासाठी रत्नागिरी आणि चिपळूण अशी दोन केंद्र तयार करण्यात आली.