मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने राहणार ?
By admin | Published: February 14, 2017 09:44 PM2017-02-14T21:44:36+5:302017-02-14T21:44:36+5:30
मालवण तालुक्यात ७१ हजार मतदार : सर्वच पक्षांकडून नव्या चेहऱ्यांना संधी
सुधीर राणे-- कणकवली शहरालगतच्या कलमठ जि.प. मतदारसंघात विविध पक्षांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा परिषदेच्या मागील दोन निवडणुकांत या मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांनी निर्विवाद वर्चस्व राखले होते. काँग्रेसला यावेळी हॅट्ट्रीक करण्याची संधी आहे. मात्र, काँग्रेसमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपने या मतदारसंघात युती करून काँग्रेसला चारीमुंड्या चितपट करण्याचे नियोजन केल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. मात्र, याठिकाणी कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी निकालापर्यंत थांबावे लागणार आहे.
कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघात कलमठसह वरवडे, पिसेकामते, कासरल, सातरल आणि आशिये या गावांचा समावेश होतो. कलमठ मतदारसंघातून सन २००७ मध्ये प्रज्ञा ढवण, तर सन २०१२ मध्ये संदेश सावंत विजयी झाले होते. यावेळी हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला आहे. तेथे भाजपच्या प्रज्ञा प्रदीप ढवण आणि काँग्रेसच्या स्वरूपा रामदास विखाळे यांच्यात थेट लढत आहे. प्रज्ञा ढवण या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत, तर स्वरूपा विखाळे या विद्यमान पंचायत समिती सदस्या आहेत.
कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या प्रज्ञा ढवण यांनी फार पूर्वीपासून प्रचार सुरू केला होता. तर कलमठ येथे काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते झाल्यानंतर स्वरूपा विखाळे यांनीही मतदारसंघात वाडीनिहाय प्रचारयंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे.
प्रज्ञा ढवण यांनी काँग्रेसच्या तिकिटावर यापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली होती. वर्षभरापूर्वी त्या भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. स्वरूपा विखाळे यांनी पंचायत समिती सदस्यपद भूषविले आहे. त्यामुळे कलमठ जिल्हा परिषदेत होणारी लढत चुरसीची होणार आहे.
कलमठ पंचायत समिती मतदारसंघात शिवसेनेचे विनायक मेस्त्री आणि काँग्रेसचे महेश लाड यांच्यात तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. तर मनसेचे श्रीकृष्ण आचरेकर आणि शिवसेनेचे बंडखोर विश्वनाथ आचरेकर हे देखील येथे रिंगणात आहेत. महेश लाड यांनी यापूर्वी कलमठ गावचे सरपंचपद भूषविले आहे. तर विनायक मेस्त्री यांनी सतत विविध उपक्रम राबवून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. कलमठ मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य असले तरी या पक्षातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमधील दरी कायम आहे. तसेच अलीकडेच अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना-भाजपमध्येही प्रवेश केला आहे. त्यामुळे कलमठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये तुल्यबळ लढतींची शक्यता आहे.
वरवडे पंचायत समिती मतदारसंघात काँग्रेसच्या राधिका राजेश सावंत आणि भाजपच्या प्रतीक्षा प्रशांत सावंत यांच्यात थेट लढत होत आहे. वरवडे हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा गाव आहे. राणेंच्या पक्षीय स्थित्यंतरातही वरवडेवासीय राणेंच्या भक्कमपणे पाठीशी राहिले आहेत. काँग्रेसच्या उमेदवार राधिका सावंत यांचे पती राजेश ऊर्फ सोनू सावंत यांनीही गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात कार्यकर्त्यांची मोठी ताकद निर्माण केली आहे.