नगरपंचायत कोणाची? कणकवलेत रंगले गजाली
By balkrishna.parab | Published: April 11, 2018 06:50 PM2018-04-11T18:50:42+5:302018-04-11T18:50:42+5:30
कोकणातील राजकारणाचा विषय आला की कणकवलीचा उल्लेख आवर्जुन करावा लागतो. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे गाव असल्याने कणकवलीला महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर ठळक स्थान मिळत आले आहे.
कोकणातील राजकारणाचा विषय आला की कणकवलीचा उल्लेख आवर्जुन करावा लागतो. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे गाव असल्याने कणकवलीला महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर ठळक स्थान मिळत आले आहे. त्यामुळेच कणकवलीतील छोटीशी घडामोडही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत असते. त्यात कणकवलीची निवडणूक म्हटली की राजकीय पारा शिगेला पोहोचणे आलेच. मग त्यातून होणारे वादविवाद, राडे, दिली जाणारी खुन्नस, सगळं, सगळं कणकवलीने अनुभवले आहे. मात्र नुकतीच आटोपलेली कणकवली नगरपंचायतीची निवडणूक मात्र या शहराच्या राजकीय इतिहासात अपवाद ठरलीय. राजकीय आरोप प्रत्यारोप वगळता कणकवलीत यंदा शांततेत मतदान पार पडलं आहे. त्यामुळे मतदानानंतर आता नगरपंचायत कोणाही ह्याच्या गजाली सध्या कणकवली आणि संपूर्ण सिंधुदुर्गात रंगल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पहिल्यांदाच कणकवलीत निवडणूक झाल्याने कणकवलीकर राणेंना साथ देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना निवडून देणार की राज्यात भांडण असूनही कणकवलीत युती करणाऱ्या शिवसेना भाजपाला साख देणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर काही महिन्यांतच स्वत:चा पक्ष सोडून भाजपाचे उमेदवार म्हणून राज्यसभा गाठली. त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रचार करताना दादांना सावधगिरी बाळगावी लागत होती. मात्र युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांना त्यांनी प्रत्येक सभेत लक्ष्य केले. आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणेंनीही अखेरपर्यंत सक्रिय राहून कणकवलीची खिंड लढवली. त्यातच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून समीर नलावडे यांना उभे करून पारकरांसमोर कडवे आव्हान उभे केले होते.
दुसरीकडे बराचा काथ्याकूट केल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये युतीवर एकमत झाले. मात्र तरीही काही प्रभागांमध्ये त्यांच्यात शेवटपर्यंत धुसफूस कायम होती. तरीही नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर, आमदार वैभव नाईक, माजी आमदार प्रमोद जठार यांनी भाजपा नेते अतुल रावराणे यांनी राणे कुटुंबीय आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासमोर आव्हान उभे करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. नगराध्यक्षपदासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि युतीसोबतच काँग्रेसतर्फे विलास कोरगावकर आणि गाव विकास आघाडीतर्फे राकेश राणे रिंगणात होते. मात्र मुख्य लढत ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि युतीच्या उमेदवारांमध्येच झाली. मात्र काँग्रेस आणि गाव विकास आघाडीचे उमेदवार किती मते घेऊन कुणाचा फायदा आणि कुणाचे नुकसान करतात यावर युती आणि स्वाभिमान पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल.
त्यातही सध्या कणकवलीच्या चौकात आणि वाड्या वाड्यांत रंगलेल्या चर्चांचा कानोसा घेतला तर नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र समीर नलावडेच बाजी मारतील असाही अनेकांचा होरा आहे. चुरशीच्या झालेल्या प्रभागांच्या निवडणुकीतही संमिश्र निकाल लागण्याचीच शक्यता अधिक आहेत. अटीतटीच्या निवडणुकीमुळे जयपराययाचे अंतरही फार नसण्याचीच शक्यता अधिक आहे. आता चार जणांच्या तोंडी चार नावे असली तरी मतदाराने नेमका कुणाला कौल दिलाय. हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईलच. तोपर्यंत वेट अँड वॉच.