हत्तीच्या शवविच्छेदनावेळी महसूल अधिकारी का नव्हता ?
By admin | Published: April 21, 2015 10:34 PM2015-04-21T22:34:55+5:302015-04-22T00:31:09+5:30
चौकशीची मागणी : मनसेचा उपवनसंरक्षकांना सवाल
सावंतवाडी : आंबेरीत ठेवण्यात आलेल्या हत्तीच्या मृत्यूला वनविभागाचे अधिकारी जबाबदार असून, त्यांची चौकशी करा व गुन्हे दाखल करा, अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली. तसेच हत्तीचे शवविच्छेदन करताना त्या ठिकाणी महसूल विभागाचा अधिकारी का बोलावण्यात आला नाही, असा सवालही मनसेच्यावतीने केला आहे. सोमवारी सकाळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांना घेराव घातला.यावेळीे कुडाळ तालुकाध्यक्ष बाबल गावडे, चैताली भेंडे, श्रेया देसाई, गुरुदास गवंडे, अभिमन्यू गावडे, सत्यविजय कविटकर, सुधीर राऊळ, शिवराम बहिरे उपस्थित होते.यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षक रमेशकुमार यांना चांगलेच धारेवर धरले. पाणी नाही तर तुम्ही हत्तींना आंबेरी येथे ठेवलेच कशाला? हत्तींना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या, याची तुम्हाला माहिती नव्हती का? हत्तींना अमानुषपणे माहूतांनी मारले, मग त्यावर तुमची देखरेख कशी नाही? हत्तीच्या मृत्यूमागे हृदयविकाराचेच कारण नेहमी का पुढे करता? आतापर्यंत मृत झालेले पाचही हत्ती हृदयविकाराच्या झटक्यानेच मृत पावले का? अन्य काहीच कारणे त्यामागे नव्हती का? अशी प्रश्नांची सरबत्ती करून यामध्ये काहीतरी गौडबंगाल असून, या सर्व प्रकाराची चौकशी करा. तसेच हत्तीच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, हे शोधा व त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करा, अशी मागणीही यावेळी मनसेच्यावतीने करण्यात आली. यावर उपवनसंरक्षक रमेशकुमार यांनी, आपण दिलेल्या पत्राची निश्चित अशी चौकशी करू, असे आश्वासन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)