नगरपंचायत स्थापन केलीच कशाला ?
By admin | Published: June 7, 2016 11:56 PM2016-06-07T23:56:18+5:302016-06-08T00:08:55+5:30
संतप्त पदाधिकाऱ्यांकडून ताशेरे : दोडामार्गात मुख्याधिकाऱ्यांअभावी बैठक तहकूब
दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची मंगळवारी आयोजित केलेली खास बैठक प्रभारी मुख्याधिकारी अनुपस्थित राहिल्याने तहकूब करण्याची वेळ नगराध्यक्षांवर आली. प्रशासन जर कर्मचारीवर्ग आणि अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात असमर्थ होते. तर नगरपंचायत स्थापन केलीच कशाला? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित पदाधिकारी व नगरसेवकांनी उपस्थित करत मुजोर प्रशासनाचा पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध केला. तसेच जून अखेरपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त न केल्यास उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची खास बैठक मंगळवारी नगरपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नगराध्यक्ष संतोष नानचे, उपनगराध्यक्ष साक्षी कोरगावकर, बांधकाम सभापती संतोष म्हावळंकर, नगरसेवक रामचंद्र ठाकूर, चेतन चव्हाण, राजेश प्रसादी, दिवाकर गवस, अरूण जाधव, सुधीर पनवेलकर, प्रमोद कोळेकर, उपमा गावडे, हर्षदा खरवत, विनया म्हावळंकर, संध्या प्रसादी, रेश्मा कोरगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मात्र, या बैठकीस प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे वेंगुर्लेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे अनुपस्थित राहिल्याने ही सभा तहकूब करण्याची वेळ नगराध्यक्ष नानचे यांच्यावर आणि पर्यायाने इतर नगरसेवकांवर आली. मुख्याधिकाऱ्यांच्या अशा कार्यपध्दतीमुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासन कसई-दोडामार्ग नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यास आणि इतर कर्मचारीवर्ग भरण्यास जर असमर्थ होते, तर नगरपंचायत स्थापन केलीच का, असा सवाल उपस्थित करत मुजोर प्रशासनाचा निषेध केला. यावेळी नानचे यांनी सध्याचे प्रभारी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यावर आमचा व्यक्तीद्वेष नाही. आमचा राग प्रशासनावर आहे. जर आज आवश्यक कर्मचारी वर्ग प्रशासनाने भरला असता व कायमस्वरूपी अधिकारी दिले असते, तर अशी सभा तहकूब करण्याची वेळ आली नसती, असे संतोष नानचे म्हणाले. (प्रतिनिधी)
मुख्याधिकाऱ्यांसाठी सत्ताधारी-विरोधक एकत्र
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचे चार, राष्ट्रवादीचे दोन, सेना-भाजपाचे प्रत्येकी पाच व मनसेचा एक असे पक्षीय बलाबल आहे. सध्या नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यात असली, तरी बहुमत मात्र काठावरच आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या इतर बैठकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सर्रास नेहमीच खडाजंगी उडाल्याची उदाहरणे अनेकवेळा घडली. मात्र, मुख्याधिकाऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधक मंगळवारी एकत्र आल्याचे चित्र अपवादाने पहायला मिळाले. शहराच्या विकासासाठी एकत्र आल्याच्या दोहोंच्या या भूमिकेचे दोडामार्ग शहरवासियांमधून स्वागत होत आहे.