त्यावेळी स्टॉलधारकांचे अश्रु पुसण्याचे औदार्य का दाखवले नाही?, बंडू हर्णे यांचा सतीश सावंतांना सवाल
By सुधीर राणे | Published: March 22, 2023 12:43 PM2023-03-22T12:43:32+5:302023-03-22T12:44:27+5:30
सतीश सावंत यांना आजवर मिळालेली सर्व पदे ही राणेंमुळेच
कणकवली: कणकवली शहरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने स्टॉल हटाव मोहिम राबवली आहे. तर ज्यांचे हातावर पोट आहे त्या भाजीविक्रेते आणि स्टॉलधारकांना गेल्या चार वर्षात आधार देण्याचे काम नगरपंचायतीनेच केले आहे. त्याची जाणीव त्यांना नक्कीच आहे. परंतू सत्तेत असताना सतीश सावंत व शिवसेनेच्या मंडळींनी अडचणीच्या काळात स्टॉलधारकांचे अश्रु पुसण्याचे औदार्य का दाखवले नाही? असा सवाल कणकवलीचे उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांनी केला.
कणकवली येथील स्टॉलधारकांच्या प्रश्नाबाबत शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी केलेल्या आरोपांना बंडू हर्णे यांनी कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, महामार्ग प्राधिकरणने न्यायालयाच्या निर्देशानुसार स्टॉलधारकांवर कारवाई केली आहे.असे असताना त्याचे खापर आमदार नितेश राणे आणि नगरपंचायतवर फोडण्याचे काम विरोधक करत आहेत. मात्र, त्यावर स्टॉलधारक विश्वास ठेवणार नाहीत.स्टॉलधारकांचे पुनर्वसन करणे जशी आमची जबाबदारी होती, तशी तुमचीही जबाबदारी नव्हती का? सत्ता असताना तुम्ही काय केले? त्यावेळी सतीश सावंत, संदेश पारकर आदी मंडळींनी तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांना सोबत घेवून कणकवली बसस्थानकाची पुनर्बांधणी करून स्टॉलधारकांना पुनर्वसनाचे गाजर दाखवले होते. त्याबाबतचा एकतरी कागद पुढे हलला काय?
स्टॉलधारकांच्या प्रश्नांची आम्हाला जाणीव आहे. लोकवस्ती आणि बाजारपेठेचा विचार करून आहे त्या परिस्थितीत तोडगा काढून त्यांना प्रस्थापित करावे लागेल. याबाबत आमदार, नगराध्यक्ष व आमचे सहकारी नगरसेवक हे एकत्रितपणे योग्य तो निर्णय घेवून लवकरच मार्ग काढतील. मात्र, संचयनीच्या ठेवीदारांचा प्रश्न जे २० वर्षात सोडवू शकले नाहीत ते दोन दिवसांत स्टॉलधारकांचा प्रश्न सोडवण्याची अपेक्षा कशी काय करतात? असा प्रश्नही हर्णे यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, सतीश सावंत यांना आजवर मिळालेली सर्व पदे ही राणेंमुळेच मिळाली आहेत. त्यावेळी राणेंना सावंत यांनी किती कमिशन दिले होते? हे जनतेसमोर त्यांनी जाहीर करावे. राणेंची साथ सोडल्यानंतर नेमके काय होते हे सावंत यांनी जिल्हा बँक निवडणुकीत अनुभवले आहे. आम्हाला महामार्ग ठेकेदाराचे हित जोपासायचे असते तर शेडेकर यांच्यावर चिखलफेक झाली नसती. महामार्गाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी आम्ही सहकार्य केले आहे. रस्त्यांचा दर्जा टिकण्यासाठीच बीबीएम ऐवजी बीएमने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कणकवली नगरपंचायतीमार्फत झालेली सर्व कामे दर्जेदार आहेत.त्यामुळे शहरातील एकतरी काम निकृष्ठ असल्याचे सावंत यांनी दाखवून द्यावे. असेही बंडू हर्णे यावेळी म्हणाले.