..तेव्हा राजीनामा का दिला नाही?; मराठा आरक्षणावरुन नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
By सुधीर राणे | Published: November 1, 2023 02:05 PM2023-11-01T14:05:32+5:302023-11-01T14:05:58+5:30
जरांगे-पाटील यांनी राजकीय बोलू नये, हा मैत्रीचा सल्ला!
कणकवली: उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण रद्द झाले. तेव्हा नैतिकता पाळून त्यांनी राजीनामा का दिला नाही? राजीनामा देण्याची प्रथम त्यांनी आपल्या घरातून सुरवात करावी. त्यांच्या पक्षातील खासदार,आमदार यांचे राजीनामे घ्यावेत. मगच दुसऱ्यांना राजीनामा द्यायला त्यांनी सांगावा. तशी हिम्मत उद्धव ठाकरे यांनी दाखवावी. असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. कणकवली येथे बुधवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
नितेश राणे म्हणाले, संजय राऊत हे एका बाजूला राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे असे म्हणतात. तर दुसऱ्या बाजुला सरकारच्या बैठकीला यायची त्यांची इच्छा आहे. आजच्या बैठकीला त्यांना बोलावले नाही. त्याबद्धल मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानतो.
आमचे सरकार टिकणारे आरक्षण देणार आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी राजकीय भाषा सुरू केली आहे.त्यांना जो कोण स्क्रिप्ट लिहून देत आहे, त्यांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाला गाल बोट लावू नये. हिंसेचे समर्थन करू नये, जाळपोळ करत असतील तर त्यांना आपण शिवरायांचे मावळे म्हणू नये. जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही. याची आम्ही खात्री देतो. कोणावर चुकीची कारवाई होत असेल तर आम्ही त्यांना मदत करू असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाला स्वतःचे चिन्ह, नाव आहे का? त्यामुळे चिरीमिरी लोकांना, दंगल भडकवणाऱ्यांना सर्वपक्षीय बैठकीला बोलावले नाही.असे सांगताना अंबादास दानवेना बोलावले होते. ते तुमच्या पक्षाचे नाहीत का ?याचे उत्तर राऊत यांनी द्यावे.
मातोश्रीचे पण इंटरनेट बंद करावे. तिथूनच दंगली भडकविल्या जातात.असा आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला. तसेच शांतता ठेवण्यासाठी इंटरनेट बंद करावे लागते. मात्र, सरपंच पदाची कधी निवडणूक लढविली नाही, त्याना राज्य कसे चालवावे हे समजणार नाही.असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.
जरांगे-पाटील यांनी राजकीय बोलू नये, हा मैत्रीचा सल्ला!
माझी किंमत भाजपला माहीत आहे. तुमची किंमत जर ठेवायची असेल तर जरांगे-पाटील यांनी राजकीय बोलायचे बंद करावे.हा माझा त्यांना मैत्रीचा सल्ला आहे. आमदारांची घरे ,गाड्या फोडणारे मराठा समाजातील नाहीत. ते ठाकरे व पवारांचे हस्तक आहेत.प्रदीप साळुंखे व बनसोडे हे कोणाचे पिल्लू आहेत याचे उत्तर राऊत यांनी द्यावे.असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.