गुजरातला चांगले प्रकल्प मग प्रदूषणकारी कोकणात का?, डाॅ.जयेंद्र परुळेकर यांचा सवाल
By अनंत खं.जाधव | Published: April 28, 2023 06:41 PM2023-04-28T18:41:35+5:302023-04-28T18:50:47+5:30
कोकणात आजपर्यंत आयटी सारखे प्रकल्प का आले नाही? त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशाही सरकारने थांबवावी.
सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आरोंदा खाडीपात्राची अधिकाऱ्यांसमवेत केलेली पाहाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनासाठी होती की जमीन खरेदी-विक्रीसाठी होती असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते डाॅ. जयंत परूळेकर यांनी केला.
कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प आणि चांगले प्रकल्प गुजरातला पळवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. मुळातच कोकणचा अभिमान सांगता मग या ठिकाणी चांगले प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करा त्यांचे आम्ही स्वागत करू, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशातील सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प
डाॅ.परूळेकर यांनी, बारसू येथे पेट्रोल केमिकल प्रकल्पाच्या निमित्ताने तेथील ग्रामस्थ व महिलांवर होणाऱ्या दडपशाही बाबत केंद्र व राज्य सरकारवर ताशेरे ओढले. बारसू येथे होणारा पेट्रोल केमिकल प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प आहे. मात्र सरकारकडून ग्रीन रिफायनरी म्हणून हा प्रकल्प पुढे करत आहेत. या ठिकाणी प्रदेशातून येणाऱ्या कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाणार आहे.
रोजगाराचे खोटे गाजर
तब्बल प्रतिवर्षी ९ कोटी मेट्रिक टन इतका कच्च्या तेलाचा साठा याठिकाणी येणार आहे. मात्र यातून निर्माण होणारे प्रदूषण हे कोकणासह गोव्याला ही हानिकारक ठरणार आहे. रोजगाराच्या नावाखाली हा प्रकल्प येथे लादण्याचा प्रयत्न होत आहे. मुळात ऑटोमेशनच्या जमान्यात येथे केवळ शिपाई, सुरक्षा रक्षक याच नोकऱ्या शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे रोजगाराचे खोटे गाजर दाखवू नका.
विकासाचा प्रकल्प पाहिजे, विषारी वायू नको
कोकणात प्रकल्प आणायला आमचा अजिबात विरोध नाही. या ठिकाणी आलेला वेदांता फाॅक्सकाॅन, टाटा एअरबाॅक्स प्रकल्प कुठे गेला? याचे उत्तर सरकारने द्यावे. आज चांगले प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. ते प्रकल्प कोकणात आणा आम्ही त्यांचे स्वागत करू. कोकणी माणसांना विकासाचा प्रकल्प पाहिजे विषारी वायू नको. कोकणात आजपर्यंत आयटी सारखे प्रकल्प का आले नाही? त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशाही सरकारने थांबवावी. जनतेला विश्वासात घ्या. त्यांना प्रकल्पाचे फायदे-तोटे समजावून नंतरच प्रकल्प लादा. कारण या देशाला आंदोलनातूनच स्वतंत्र मिळाले आहे. हे सरकारने लक्षात ठेवावे.असेही डाॅ.परुळेकर म्हणाले.