जनतेने परिवर्तन घडविले ते यासाठीच का? : सुभाष नाईक
By admin | Published: January 16, 2015 09:29 PM2015-01-16T21:29:17+5:302015-01-17T00:11:40+5:30
सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातून प्रकल्प आणले पाहिजेत.
आरोंदा : गेल्या तीन वर्षांपासून आरोंद्यातील सर्वपक्षीय ९० टक्के जनता जेटीविरोधात लढा देत आहे. विनाशकारी प्रकल्पांना जनता साथ कशी देईल? भावी पिढीच्या भवितव्याचा काहीच विचार न करणारी तसेच केवळ संपत्तीची हाव असणाऱ्या फक्त १० टक्के जनतेने जेटीला समर्थन दिले, म्हणून काय विनाशकारी प्रकल्पांना साथ द्यायची? जनतेने सरकार परिवर्तन घडविले, ते यासाठीच का, असे सवाल भारतीय जनता पार्टी आरोंदा अध्यक्ष व तालुका कार्यकारिणी सदस्य सुभाष नाईक यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांना लेखी पत्राद्वारे केले आहेत. दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमधून आरोंदा जेटीसंदर्भात समर्थनाची प्रतिक्रिया दिल्यानंतर सुभाष नाईक यांनी हे पत्र दिले आहे. त्यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, खरं पाहिलं गेलं, तर आपल्या भारत देशात तसेच भारतातील सर्व राज्यात सुख, शांती, समृद्धी नांदवायची असेल, तर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातून प्रकल्प आणले पाहिजेत. तसेच आरोंद्यातील जनतेला धमकीसारखे शब्द वापरु नये. सिंधुदुर्गातील जुने निष्ठावंत भाजपचे पदाधिकारी आबा नाईक, विजय मराठे, अतुल काळसेकर, शाम काणेकर, यशवंत आठलेकर तसेच मंदार कल्याणकर, दादू कविटकर या पदाधिकाऱ्यांनी कधीही जनतेला भडकाविण्यासारखे वक्त व्य केले नाही. जठार यांच्याकडे सुध्दा शांतवृत्ती, तेजस्वी बुद्धिमत्ता व सोज्वळ विचारसरणी आहे. मग आपण आज नवीनच प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली यांच्याविषयी एवढी आत्मियता का? आणि ते सुद्धा खरी वस्तुस्थिती न पाहता. आम्ही तीस-पस्तीस वर्षे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी आहोत. ते आपल्याला नकोसे झाले आहेत का? आरोंदा जेटीबाबत राजकीय खेळी खेळण्यापेक्षा सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन आरोंद्याच्या जतनेच्या हिताच्या दृष्टीकोनातून पावले उचलावीत. सध्या आरोंदा जेटी हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे जनतेच्या बाजूने न्यायालयात पाठपुरावा करावा, जेटीऐवजी पर्यटन दृष्टीकोनातून प्रकल्प आणावेत व आरोंदा गाव शांतताप्रिय बनवावा, अशी विनंतीही सुभाष नाईक यांनी प्रमोद जठार यांना पत्रातून के ली आहे. (प्रतिनिधी)