सावंतवाडी ‘अर्बन’ची निवडणूक का नाही?
By admin | Published: June 21, 2016 09:46 PM2016-06-21T21:46:50+5:302016-06-22T00:14:04+5:30
प्रशासक नेमा : स्वराज्य संघटनेचा सवाल, उपनिबंधकांना निवेदन
सावंतवाडी : सावंतवाडी अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपली असून बँकेची निवडणूक घ्या, अन्यथा बँकेवर प्रशासक नेमा, अशी मागणी स्वराज्य संघटनेने केली आहे. तसेच १७ पैकी ८ संचालकांनी राजीनामे दिले असतानाही बँकेचे निर्णय कसे काय घेतले जातात, असा सवालही यावेळी स्वराज्य संघटनेने विचारला आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन उपनिबंधक यांनाही दिले आहे.
शासन निर्णयानुसार व धोरणानुसार सहकारी बँकांच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुका या मुदतीत घेणे बंधनकारक आहे. मात्र, बँकेची मुदत संपली असतानाही निवडणूक न घेणे योग्य नाही. संचालकांना मुदतवाढ देण्याबाबत कोणताही निर्णय शासनपातळीवर घेण्यात आला नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार संचालक मंडळांची पाच वर्षे मुदत संपल्यानंतर तत्काळ या बँकेवर प्रशासक नेमणे गरजेचे असतानाही अद्यापपर्यंत प्रशासक नेमण्यात आला नाही. हे योग्य नाही, असेही यावेळी स्वराज्य संघटनेने स्पष्ट केले.
सावंतवाडी अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेत सुमारे १७ संचालक पाच वर्षांसाठी निवडून देण्यात आले. मात्र, यातील ८ संचालकांनी तर अवघी दोन वर्षे होताच आपले राजीनामे दिले आहेत. तर चार संचालक बँकेच्या कामकाजात सहभागीच होत नाहीत. त्यामुळे बँकेच्या प्रगतीचे निर्णय अवघे पाच संचालक घेतात. ते कोणते निर्णय घेतात ते १२ संचालकांना माहिती नाही.
त्यामुळे भविष्यात सावंतवाडी अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेच्या प्रगतीसाठी निवडणुका होणे बंधनकारक आहे. अन्यथा बँकेवर प्रशासक तरी नेमला जावा, अशा मागणीचे निवेदन स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अमोल साटेलकर, सुनिल पेडणेकर, अॅड. प्रसाद कासकर, एल. एस. निचम यांनी उपनिबंधक ओरोस यांच्याकडे दिले आहे. (प्रतिनिधी)
आमचा प्रस्ताव निबंधक कार्यालयाकडे : पास्ते
अर्बन बँकेच्या संचालक मंडळाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. आम्ही याबाबत निबंधक कार्यालयाला कळविले असून, त्यांनी निवडणुकीबाबत पत्रव्यवहारही केला आहे. आता सर्वस्वी निर्णय हा निबंधक कार्यालयाचा आहे. आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. आमच्यामुळे निवडणूक होत नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. असे मत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पास्ते यांनी व्यक्त केले.