संगणक परिचालक नसताना पैसे का ठेवले ? : गणेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 04:48 PM2020-07-17T16:48:39+5:302020-07-17T16:53:01+5:30
देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायतीकडे गेली तीन वर्षे संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) नसतानाही २ लाख ७८ हजार ५३७ रुपये निधी प्रशासनाकडे जमा करण्यात आला आहे. तेथे डाटा आॅपरेटर नसताना हे पैसे का ठेवण्यात आले आहेत? ग्रामपंचायतीला व्याजासह पैसे परत देणार का? असा सवाल सदस्य गणेश राणे यांनी वित्त समिती सभेत उपस्थित केला.
ओरोस : देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायतीकडे गेली तीन वर्षे संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) नसतानाही २ लाख ७८ हजार ५३७ रुपये निधी प्रशासनाकडे जमा करण्यात आला आहे. तेथे डाटा आॅपरेटर नसताना हे पैसे का ठेवण्यात आले आहेत? ग्रामपंचायतीला व्याजासह पैसे परत देणार का? असा सवाल सदस्य गणेश राणे यांनी वित्त समिती सभेत उपस्थित केला.
येथील बॅ. नाथ पै सभागृहात वित्त समिती सभा सभापती बाळा जठार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी वित्त समिती सचिव व सदस्य नागेंद्र परब, महेंद्र चव्हाण, नितीन शिरोडकर, गौतम जगदाळे, गणेश राणे, जेरॉन फर्नांडिस आदींंसह खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळी सभापती बाळा जठार यांनीही ग्रामपंचायतीला पैसे व्याजासह तुम्ही परत करणार का? असा प्रश्न खातेप्रमुखांना केला. यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. यावर सभापती जठार म्हणाले, ग्रामपंचायतीची अनेक विकासकामे या पैशातून झाली असती. तुमच्याकडे पैसे ठेवून काय उपयोग? त्यांचे पैसे परत करा. ग्रामपंचायतीला व्याजासह पैसे द्या, असे आदेश त्यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जिल्हा परिषदअंतर्गत येणारे रस्ते खराब झाले आहेत. ते गणेश चतुथीपूर्वी सुस्थितीत करावेत, अशी मागणी सदस्यांनी केली.
यावेळी कुडाळ तालुक्यातील अणाव पालववाडी, वेशीवाडी येथील डांबरीकरण केलेला रस्ता वाहून गेलेला आहे, असे सदस्य नागेंद्र परब यांनी सांगितले. तर देवगड येथील मोंंडपार येथील रस्ताही खराब झाला असल्याचे सदस्य गणेश राणे यांनी सांगितले. जिल्ह्यातील अंगणवाडी शाळेतील मुलांना शाळेत बोलावून पाच-पाच जणांचे वजन व उंची तपासण्यात येते. त्यासाठी या मुलांना पालकांसह शाळेत बोलविण्यात येत होते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढून अंगणवाडीतील लहान मुलांना कोणताही त्रास उदभवू नये असा शासनाचा आदेश आल्याने लहान मुलांची ग्रामपंचायत कार्यालय येथे वजन-उंची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ती रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग
देवगड तालुक्यातील मोंडपार येथील ग्रामपंचायतीत गेली तीन वर्षे डाटा आॅपरेटर नसून या ग्रामपंचायतीचे २ लाख ७८ हजार ५३४ रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. हे पैसे २०१९ पर्यंत घेतलेले आहेत. मात्र, डाटा आॅपरेट कामालाच नसल्याने हे पैसे घेण्याचे कारण काय? असा प्रश्न गणेश राणे यांनी सभेत उपस्थित केला.