चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 06:54 PM2019-09-27T18:54:56+5:302019-09-27T18:55:47+5:30
घटनेनंतर त्याचा मोठा भाऊ व त्याची पत्नी यांनी त्याच्या घरी धाव घेतली. यावेळी अमितची पत्नी अनुराधा निपचित पडलेली दिसली. त्यांनी अमितसमवेत तिला आचरा आरोग्य केंद्रात हलविले.
आचरा : मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी येथे पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. चिंदर भटवाडी येथे राहत असलेल्या अमित दत्तात्रय मुळे (३०) याने राहत्या घरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत झालेल्या भांडणातून पत्नी अनुराधा (२८) हिचा गळा दाबून तिची हत्या केली. घटनेनंतर पत्नीचा भाऊ लक्ष्मण मनोहर घाडी (रा. त्रिंबक) यांनी आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीस अटक केली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, आपली बहीण व चिंदर येथील अमित मुळे यांनी ९ वर्षांपूर्वी पे्रमविवाह केला होता. आठ दिवसांपूर्वीच बहीण माहेरी आली होती व तिने पती अमित हा आपल्या चारित्र्यावर संशय घेत असून आपणास मारझोड करतो असे सांगितले होते. त्यांच्यात खटके उडत असल्याची माहितीही तिने सांगितली होती. बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत अमित याने तिची हत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर त्याचा मोठा भाऊ व त्याची पत्नी यांनी त्याच्या घरी धाव घेतली. यावेळी अमितची पत्नी अनुराधा निपचित पडलेली दिसली. त्यांनी अमितसमवेत तिला आचरा आरोग्य केंद्रात हलविले. आचरा आरोग्यकेंद्रात आणल्यावर वैद्यकीय अधिकारी जाधव यांनी तिचा म्यृत्यू झाल्याचे सांगितले. आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विनायक साटम यांनी अमित याला ताब्यात घेतले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चिंदर येथे राहणाऱ्या अमित याने अनुराधा हिच्याशी पे्रमविवाह केला होता. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.
अमित हा कामाच्या निमित्ताने मुंबईला राहत असे. ६ महिन्यांपूर्वीच तो पत्नीसह गावी रहावयास आला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अमितने आपणच पत्नीला गळा दाबून मारल्याचे कबूल केल्याची माहिती आचरा पोलिसांनी दिली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतचा अधिक तपास आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. एच. कळेकर, विनायक साटम, सुनील चव्हाण, बाळू कांबळी करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर आचरा पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.