पावसासह वन्यप्राण्यांचा धुडगूस
By admin | Published: October 21, 2015 09:52 PM2015-10-21T21:52:11+5:302015-10-21T21:52:11+5:30
भात कापणीचा हंगाम : कडावल-हिर्लोक परिसरातील शेतकरी चिंतेत
सुरेश बागवे -कडावल व हिर्लोक परिसरात खरीप भात कापणीस सुरूवात झाली आहे. मात्र, पाऊस व वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी संकटात सापडले असून, अंतिम टप्प्यात आलेली शेती कशी वाचवायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. हिर्लोक येथील आपट्याची मळी, सतीचा उचवळा, भिकेडोंगरी, दासशेळ भागातील शेती गवे व वनगार्इंनी उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
निसर्गाच्या दृष्टचक्राचा फटका यंदा शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरूवातीपासूनच बसत आहे. तरवा लावणीच्यावेळी गरज असताना पाऊस गायब झाला. आता भातकापणीवेळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच वन्य प्राण्यांनीही धुडगूस घालायला सुरूवात केली आहे. पावसाचे अरिष्ट आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव अशा दुहेरी अडचणीत कडावल परिसरातील शेतकरी सापडला आहे. परिसरात हळव्या जातीचे काही वाण गणेशोत्सव कालावधीतच कापणीयोग्य झाले होते. मात्र, गणेशोत्सव व त्यानंतर म्हाळवसाच्या धामधुमीमुळे शेतकऱ्यांना भातकापणीचा मुहूर्त करता आला नाही. आता काही प्रमाणात भातकापणीस सुरूवात झाली असली, तरी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पावसामुळे भातकापणीत वारंवार अडथळा येत आहे. याचा परिणाम भात उत्पादन व वैरण उत्पादनावर होणार आहे.
भातलावणीनंतर कडावल व हिर्लोक पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये गवे व वनगार्इंनी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते आणि आता भात कापणी हंगामातही हा उच्छाद सुरूच आहे. येथील आपट्याची मळी, सतीचा उचवळा, भिकेडोंगरी, दासशेळ भागातील शेती गवे व वनगाईनी उद्ध्वस्त केली असून, दत्ताराम बागवे, सीताराम सावंत, एकनाथ बागवे, प्रदीप साटम,
सुवर्णा साटम तसेच इतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
आहे.
वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण
शेतीवर पावसाचे संकट कायम असतानाच दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. कडावल परिसरातील कडावल, आवळेगाव, पांग्रड, निरूखे आदी तर हिर्लोक पंचक्रोशीमधील किनळोस, हिर्लोक, कुसगाव, गिरगाव, नारूर, रांगणातुळसुली व निवजे आदी गावांमध्ये गवे व वनगार्इंचा उपद्रव वाढला आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यापासून म्हणजे तरवा लावणीपासून हंगामाच्या अंतिम टप्प्यापर्यंत वन्य प्राण्यांचा उपद्रव येथील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकला
यंदा निसर्गाच्या दृष्टचक्राचा फटका शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरूवातीपासून बसत आहे. गरज असतेवेळी पाऊस गायब झाला. आता भातकापणीच्या हंगामात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.
त्यातच वन्यप्राण्यांनीही धुडगूस घालायला सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून, शेती वाचवायची कशी, या विवंचनेत सापडले आहेत.