सच्चे शिवसैनिक निलेश राणेंना स्वीकारणार ?, परशुराम उपरकर यांचा सवाल 

By सुधीर राणे | Published: October 7, 2024 03:54 PM2024-10-07T15:54:49+5:302024-10-07T15:55:41+5:30

कोकणातील घराणेशाही मतदारांनी हाणून पाडण्याची गरज  

Will a true Shiv Sainik accept Nilesh Rane, asked Parashuram Uparkar  | सच्चे शिवसैनिक निलेश राणेंना स्वीकारणार ?, परशुराम उपरकर यांचा सवाल 

सच्चे शिवसैनिक निलेश राणेंना स्वीकारणार ?, परशुराम उपरकर यांचा सवाल 

कणकवली: मी स्वतंत्र आहे, कोणत्याही पक्षाकडे प्रवेशासाठी गेलेलो नाही. परंतू निलेश राणेंच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. कोकणात राणेंच्या रुपाने सुरू असलेली घराणेशाही मतदारांनी हाणून पाडण्याची गरज आहे. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या निलेश राणेंना सच्चे शिवसैनिक स्वीकारणार का? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला.

कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, राज्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये बापानंतर मुलगा किंवा मुलगी आमदार, खासदार होत असल्याची परिस्थिती आहे. तर सिंधुदुर्गात नारायण राणे आपल्या मुलांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एक मुलगा भाजपचा आमदार आहे. आता दुसऱ्या मुलाचे पुनर्वसन व्हावे, यासाठी त्यांची धडपड आहे. दुसरा मुलगा आमदार व्हावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट त्यांनी घेतली आहे. मात्र, राणे आपल्या कुटुंबासाठी कितीवेळा विविध पक्षांमध्ये जातील? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी किती राहायचे हे लोकांनी ठरवले पाहिजे. 

काही दिवसांनी सुधीर सावंतांचे वक्तव्य खरे झाले

माजी खासदार सुधीर सावंत यांनी राणे आगामी काळात काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे वक्तव्य केले होते. तेव्हा राजापूर न्यायालय परिसरात त्यांच्यावर दगडफेक  झाली होती. मात्र, काही दिवसांनी त्यांनी केलेले वक्तव्य खरे झाले.

तेलींना तिकीट न मिळण्यासाठी राणेंचे प्रयत्न

सिंधुदुर्गातील राणेंचे काही सहकारी ते जिथे जातात तिथे जाऊन आपली पक्ष निष्ठा बाजूला ठेवून कामांचा ठेका मिळवून समाधानी राहतात. मात्र, ज्या सहकाऱ्यांना राजकीय अभिलाषा आहे, त्यांना राणेंनी झाकून ठेवले आहे. २००५ साली राणेंच्या विरोधात मी विधानसभा लढलो. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार केले. त्यावेळी आपल्याला कमीपणा येवू नये यासाठी राजन तेली यांना राणेंनी आमदार केले. परंतु आज गरज संपल्यावर राजन तेलींना तिकीट न मिळण्यासाठी राणे प्रयत्न करीत आहेत. 

'मतदारांनी विचार करावा'

आम्ही २००५ मध्ये राणेंची संगत सोडली. शिवसेनेतील आमचे जुने सहकारी व काही शिवसैनिक त्या पक्षात मी प्रवेश करावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे समाजात काही चर्चा होत आहे. मात्र, मी अजूनही कुठला निर्णय घेतलेला नाही. सोबतच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. आता राजकरणात जनतेची लूट करायची आणि टक्केवारीचे राजकारण करायचे, पैशाचा वापर करून निवडणूक जिंकायची असे सुरू आहे. हे आम्हाला  जमणारे नाही. मतांसाठी पैसे घ्यायचे आणि पुढील ५ वर्षे विकास कामे झाली नाही तरी गप्प बसायचे, असे मतदारांना करावे लागेल. त्यामुळे त्याचा त्यांनी जरूर विचार करावा. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

Web Title: Will a true Shiv Sainik accept Nilesh Rane, asked Parashuram Uparkar 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.