‘जैतापूर’विरुद्धचा संघर्ष कायम ठेवणार

By admin | Published: June 19, 2014 01:02 AM2014-06-19T01:02:48+5:302014-06-19T01:14:15+5:30

ग्रामस्थ ठाम : काँग्रेस आणि भाजप सरकारमध्ये फरक नाही

Will continue the fight against 'Jaitapur' | ‘जैतापूर’विरुद्धचा संघर्ष कायम ठेवणार

‘जैतापूर’विरुद्धचा संघर्ष कायम ठेवणार

Next

राजापूर : यापूर्वीचे काँग्रेस सरकार आणि आताचे भाजप सरकार यांच्यामध्ये जराही फरक नाही. ते एकाच माळेचे मणी आहेत. त्यांना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करायचा नाही, हेच दिसून येते. त्यामुळे प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत संघर्ष कायम राहील, असा निर्धार समस्त प्रकल्पविरोधकांनी नाटे येथे केला. प्रकल्पाविरोधातील मोर्चानंतर आयोजित सभेत ग्रामस्थांनी ही भूमिका मांडली.
जनहक्कसमितीच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रकल्प विरोधकांचा मोर्चा साखरी नाटेमधील हुजरा भागापासून सुरू झाला. नाटे येथील तबरेज चौकापर्यंत बुलंद घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या मोर्चात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, जनहक्कसमितीचे अध्यक्ष भिकाजी वाघधरे, सचिव व पं. स.चे सदस्य दीपक नागले, जि. प.चे सदस्य अजित नारकर, शीतल हर्डीकर, पर्यावरण तज्ज्ञ सत्यजित चव्हाण, शास्त्रज्ञ प्रदीप इंदूलकर, मंगेश चव्हाण, मन्सूर सोलकर, अलिमियाँ म्हसकर, मौलाना तालीब बांगी, नजीक तमके, सभापती कमलाकर कदम, विलास अवसरे, राजन कोंडेकर, पं. स. सदस्या रेखा कोंडेकर, विभागप्रमुख राजा काजवे, रविकिरण तोरस्कर, विलास केरकर, अमिन हकीम, मच्छिमार नेते अमजद बोरकर, अलिमियाँ म्हसकर यासहित परिसरातील बागायतदार मच्छिमार आणि तमाम प्रकल्प विरोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तबरेज चौकात झालेल्या सभेत प्रकल्प हटविण्याबाबतचा निर्धार कायम असल्याचेच सर्व वक्त्यांनी सांगितले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली. काँग्रेसप्रमाणेच या सरकारकडून न्याय मिळेल याची अपेक्षा करण्यात अर्थ नाही, असे सांगताना त्यांनी आपला लढा कायम ठेवण्याचे आवाहन केले.
शिवसेना प्रकल्पाच्या विरोधात असल्याने नक्की हा प्रकल्प रद्द होईल, असा विश्वास मच्छिमार नेते अमजद बोरकर यांनी व्यक्त केला. यापूर्वी साखरी नाटेमध्ये आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचे वचन दिले आहे. ते आपला शब्द नक्की पाळतील, अशी आशा बोरकर यांनी व्यक्त केली. आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Will continue the fight against 'Jaitapur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.