महामार्ग निकृष्ट कामाबाबत याचिका दाखल करणार : परशुराम उपरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 07:44 PM2020-07-16T19:44:58+5:302020-07-16T19:49:50+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर असलेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय कुठे उभारायचे यावरून शिवसेनेचेच लोकप्रतिनिधी राजकारण करून दिशाभूल करीत आहेत, असा आरोप माजी आमदार व मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी कुडाळ येथे केला. महामार्ग चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामकाजाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर असलेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय हे खरेतर कुडाळमध्येच उभारण्याचा अजूनही शासन निर्णय आहे. मात्र, याबाबत तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यावेळी केवळ बैठक घेऊन ते सावंतवाडीत करण्याचा घाट घातला होता. आता शिवसेनेचेच लोकप्रतिनिधी हे रुग्णालय कुठे उभारायचे यावरून राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत, असा आरोप माजी आमदार व मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर केला. महामार्ग चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामकाजाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहावर माजी आमदार व मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव बाळा पावस्कर, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर, राजेश टंगसाळी, रामा सावंत, संतोष सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर असलेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीत की अन्य कोठे बांधण्यात यावे यावरून शिवसेनेचेच लोकप्रतिनिधी राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. हे रुग्णालय खरेतर कुडाळ येथे मंजूर असल्याचा शासन निर्णय असतानाही तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यावेळी केवळ बैठक घेऊन ते रुग्णालय सावंतवाडीत करण्यात येईल असे सांगत भूमिपूजन केले होते.
मात्र, अद्यापही ते रुग्णालय कुडाळमध्येच करण्याच्या शासन निर्णयात कोणताच बदल झालेला नाही. आता खासदार, आमदार राजकारण करीत असून सावंतवाडी येथील काही शिवसेनेचे पदाधिकारी केसरकर यांच्या तर काहीजण खासदार विनायक राऊत यांच्या बाजूने असल्याने शिवसेनेत दोन गट असल्याचे दिसत आहेत.
सातारा जिल्ह्यात मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय हे सर्व एकाच ठिकाणी ६० एकरच्या जागेत आहे. त्यामुळे चांगल्याप्रकारे सेवा सुविधा तिथे उपलब्ध होतात. अशाच धर्तीवर हे रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दोन्ही एकत्र असणे गरजेचे आहे. त्यामुळे ते शासन निर्णयाप्रमाणे कुडाळमध्ये व्हावे, असेही उपरकर यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
उच्च न्यायालयात दाद मागणार
महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे आम्ही सुरुवातीपासून सांगितले. सोमवारी कणकवली येथील संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेवरून तेथील महामार्गाच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे कामाची पाहणी करून फोटो काढणाऱ्यांना आता कळले असेल, असाही टोला त्यांनी लगावत महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामाबाबत, आॅडिटबाबत व भौगोलिक परिस्थितीचा आढावा न घेता काम केल्याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले.