नारायण राणे-राज ठाकरे एकत्र येणार? एकच चर्चा मनसेच्या आंदोलनाला राणेंचा पाठिंबा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 05:19 AM2019-08-14T05:19:35+5:302019-08-14T05:20:00+5:30
कोकणातील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार असून या आंदोलनास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मालवण : कोकणातील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेना आंदोलन करणार असून या आंदोलनास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राणे आणि राज ठाकरे हे दोन नेते आगामी काळात एकत्र येणार का, याचीच चर्चा कोकणात सुरू झाली आहे.
मालवण येथील दैवज्ञ भवन येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची बैठक खासदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राणे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून मी यशस्वी झालो, मात्र सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलो तरी मागच्यावेळी यशस्वी होऊ शकलो नाही, ही दु:खाची बाब आहे. मागील निवडणुकीत वैभव नाईक यांनी केलेला पराभव मी विसरू शकत नाही.
१९९० पासून मला ८० टक्केच्यावर मताधिक्य मिळायचे. मात्र लोकसभा निवडणुकीत मताधिक्याची टक्केवारी घसरली असून महिन्याभरात सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागून मतांची ८० टक्के मतांची तजविज करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत
आत्मचरित्राचे प्रकाशन
नारायण राणे यांच्या आत्मचरित्राचे १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रकाशन होणार आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ न दिल्यामुळे हे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.