एसटी भरतीत समाविष्ट उमेदवारांवर अन्याय होऊ देणार नाही- सतीश सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 09:08 PM2017-12-12T21:08:58+5:302017-12-12T21:09:43+5:30
कणकवली : एसटी महामंडळात चालक कम वाहक भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांची तयार केलेली यादी सदोष असून ती बदलून योग्य यादी 20 डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात यावी.
कणकवली : एसटी महामंडळात चालक कम वाहक भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांची तयार केलेली यादी सदोष असून ती बदलून योग्य यादी 20 डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात यावी. तोपर्यंत निवड यादीतील उमेदवारांचे थांबविलेले प्रशिक्षण सुरु करु नये. अशी मागणी एस. टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांच्याकडे करतानाच एस.टी. भरतीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत यांनी मंगळवारी घेतला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एस.टी. महामंडळाच्या चालक कम वाहक भरतीत सदोष निवड यादिचा घोळ समोर आला होता. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याने भरती प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला होता. तसेच जोपर्यन्त योग्य निवड यादी जाहिर होत नाही तोपर्यन्त उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु करु नये.अशी मागणी मराठा समाजाच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे विभाग नियंत्रकानी वरिष्ठांशी बोलून प्रशिक्षण थांबविले होते.
या पार्श्वभूमिवर मंगळवारी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात सतीश सावंत यांची भेट एस.टी. भरतीत समाविष्ट झालेल्या उमेदवारांनी घेतली. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, मराठा समाज युवा अध्यक्ष सुशिल सावंत, दामोदर सावंत, अशोक राणे , अनिल साटम आदी उपस्थित होते.
यावेळी सदोष यादिचा फटका बसलेल्या उमेदवारांनी आमच्यावरील अन्याय दूर होत नाही तोपर्यन्त इतर उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु करु नये. मागच्या भरतीच्या वेळीहि आमच्यावर अन्याय झाला होता.अशी भूमिका मांडली. तर निवड यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी एक महीना प्रशिक्षण बंद असल्याने आमची अडचण झाली आहे. आमचे सुरु असलेले काम आम्ही सोडल्याने कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न उपस्थित करीत प्रशिक्षण सुरु करा. अन्याय झालेल्या उमेदवारांना आम्ही सहकार्य करतो असे सांगितले.
या विषयावर सुमारे दीड तास चर्चा झाली. तसेच कोणावरहि अन्याय होऊ नये यासाठी सर्वसमावेशक तोडगा काढण्यात आला. त्यानंतर कणकवली येथील एस.टी. च्या विभागीय कार्यालयात विभाग नियंत्रकांची भेट घेण्यात आली.यावेळी एस.टी.चे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी लवू गोसावी उपस्थित होते.
यावेळी सतीश सावंत यांनी विभाग नियंत्रकांकडून एस.टी. भरती बाबत माहिती जाणून घेतली. तसेच एस.टी. भरती करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात बनविण्यात आलेली उमेदवारांची निवड यादी सदोष आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्यासाठी याबाबत सखोल चौकशी करून त्रुटी दूर करून योग्य यादी 20 डिसेंबर पूर्वी जाहिर करावी. तसेच तोपर्यन्त निवड यादितील उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु करु नये.
ही नवीन निवड यादी जाहिर झाल्यानंतर त्याची पहाणी करून एस.टी. भरतीत समाविष्ट झालेल्या उमेदवारांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. अशी भूमिकाही सतीश सावंत यांनी स्पष्ट केली.
विभाग नियंत्रकानी या मागणीला समंती दर्शवून वरिष्ठ स्तरावर आपले याबाबत बोलणे सुरु असल्याचे सांगितले.
एस.टी. तील एक कर्मचारी अन्य जिल्ह्यातील उमेदवारांना अनधिकृतपणे मदत करीत असतो. त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणीहि यावेळी विभाग नियंत्रकाकडे करण्यात आली. याबाबतही चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी सांगितले.
भरतीसाठी उमेदवारांची परीक्षा घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची मागणी माहिती अधिकारांतर्गत करण्यात आली आहे. ते फुटेज लवकर उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
---- प्रस्ताव पाठवा, पाठ पुरावा करु !---
सिंधुदुर्ग विभागात 769 पदांसाठी भरती होती. मात्र 325 उमेदवारांची निवड झाली आहे. उर्वरित आरक्षित पदांवर उमेदवार मिळालेले नाहीत. त्यामुळे ही पदे रिक्त रहात आहेत. असे चेतन हसबनीस यांनी सांगितले. यावेळी या रिक्त पदांवर सर्वसाधारण प्रवर्गातील पात्र उमेदवारांची भरती करण्याचा प्रस्ताव
वरिष्ठ पातळीवर पाठवा . त्याचा आम्ही पाठपुरावा करु असे सतीश सावंत यानी हसबनीस यांना सांगितले.